राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पुण्यातील वफ्फ बोर्ड घोटाळ्यावरून सक्तवसुली संचलनालयावर (ED) तोफ डागलीय. ईडी ७ कोटी रुपये लुटणाऱ्या लोकांची शिफारस करत आहे. ईडी माध्यमांमध्ये खोट्या बातम्या पेरत आहे, असा आरोप मलिक यांनी केलाय. तसेच ईडीने किरीट सोमय्या यांना प्रवक्ता म्हणून नेमलं आहे का? असा सवालही नवाब मलिकांनी विचारला. ते पत्रकारांशी बोलत होते.
नवाब मलिक म्हणाले, “ईडी भाजपाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून बातम्या पेरत आहे. पुण्यात आम्ही एफआयआर दाखल केली होती. त्याबाबत ते तिथं गेले आणि चौकशी सुरू केली. तसेच माध्यमांमध्ये वफ्फ बोर्डाच्या ७ कार्यालयांवर छापेमारी केल्याचं पेरलं. त्याच दिवशी वफ्फ बोर्डावर कोणतीही छापेमारी झाली नसल्याचं आम्ही स्पष्ट केलं. त्यांना चौकशी करायची असेल तर आमच्याकडे ३० हजार संस्था नोंदणीकृत आहेत. त्या सर्वांचे कागदपत्रे देण्यास आमची तयारी आहे.”
“ईडीने किरीट सोमय्या यांना प्रवक्ता केलं असेल तर अधिकृतपणे जाहीर करा”
“माझ्या माहितीप्रमाणे शुक्रवारी (१० डिसेंबर) एका वफ्फ बोर्डाच्या अधिकाऱ्याला बोलावण्यात आले. तसेच तुम्ही एफआयआर चुकीची नोंदवल्याचं ईडीने अधिकाऱ्याला सांगितलं. ज्या लोकांनी ७ कोटी रुपये लुटले त्याच लोकांची शिफारस ईडीचे अधिकारी करत आहेत. ईडीने किरीट सोमय्या यांना त्यांचा प्रवक्ता बनवलं असेल तर अधिकृतपणे जाहीर करा. ईडी महाराष्ट्रात खेळ करत आहे. ते जर खरंच काही कारवाई करत असतील तर अधिकृत प्रेस नोट काढा. केवळ कुजबुज करून, माध्यमांमध्ये बातम्या पेरून महाराष्ट्रातील मंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचं काम बंद करा,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
हेही वाचा : “सुना है, मेरे घर आज कल में…”, नवाब मलिक यांच्या नव्या ट्वीटनंतर चर्चांना उधाण
“वफ्फ बोर्ड घोटाळ्यात भाजपाच्या एका नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल होणार”
“किरीट सोमय्या पुण्यातील वफ्फ बोर्डात नवाब मलिक यांनी घोटाळा केला आहे असा आरोप करत आहेत. किरीट सोमय्यांना मला हे सांगायचं आहे की पुढील आठवड्यात वफ्फ बोर्ड घोटाळ्यात भाजपाच्या एका नेत्याच्या विरोधात गुन्हा दाखल होईल. त्याला अटक होईल, मग ईडीलाही बोलवा. त्यातून बरीच माहिती समोर येईल,” असं म्हणत मलिकांनी सोमय्यांना इशारा दिला आहे.