मुंबई : पर्यटक व्हिसाचे दीर्घकालीन व्हिसामध्ये रूपांतर करण्यासाठी कथित बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपाप्रकरणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज आणि फ्रेंच सून लॉरा हेमेलिन उर्फ आयेशा यांना सत्र न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला.
कुर्ला पोलिसांनी गेल्या आठवड्यात या दोघांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोघांनी अटकेच्या भीतीने सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी या दाम्पत्याला सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर करून दिलासा दिला.
हेही वाचा >>> तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण : अभिनेता शिझान खान याची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
हेमेलिन हिने पर्यटक व्हिसाचे दीर्घकालीन व्हिसामध्ये रूपांतर करण्यासाठी अर्ज करताना बनावट कागदपत्रे सादर केली, असा पोलिसांचा आरोप आहे. तर दोघांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. तसेच त्यांनी विवाह प्रमाणपत्र मिळविण्यासाठी नियुक्त केलेल्या दलालाने त्यांची फसवणूक केल्याचा दावा केला. या दलालाने आपल्यासह आणि १८ जणांची फसवणूक केल्याचा दावाही दोघांनी केला. आहे. आपण ही बनावट कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची फसवणूक केलेली नाही, असा दावाही फराज आणि त्याच्या पत्नीने केला आहे.