मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून मुंबईत सुरू झालेल्या ड्रग्ज रॅकेटचं प्रकरण अद्याप संपलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात सातत्याने पत्रकार परिषद घेऊन एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आणि एनसीबीच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर एक गंभीर आरोप केला आहे. तसेच, एनसीबीकडून देखील मागील तारखांच्या पंचनाम्यांवर पंचांच्या सङ्या घेऊन पंचनामे बदलण्याचे प्रकार केले जात असल्याचं ते म्हणाले. यासाठी त्यांनी एक एनसीबी अधिकारी आणि पंच यांच्यातल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील पत्रकार परिषदेत ऐकवली.
समीर वानखेडेंच्या एक्स्टेन्शनवर निर्णय का नाही?
३१ डिसेंबर रोजी मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पदाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, अजूनही त्यांना एक्स्टेन्शन दिलंय किंवा नवी जबाबदारी दिलीये याबाबत खुलासा होऊ शकलेला नाही. त्यावरून नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.
“समीर वानखेडे बातम्या प्लांट करतायत की मला एक्सटेन्शन नकोय. मी तीन महिने सुटीवर जाणार आहे. पण माझ्या माहितीनुसार दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. ३१ तारखेला एक्स्टेन्शन संपल्यानंतर त्यांना रिलीव्ह का केलं गेलं नाही? किंवा ते एक्सटेंड का नाही केलं गेलं? यावर निर्णय का प्रलंबित आहे? माझी माहिती आहे की भाजपाचे मोठे नेते गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहेत की एक्स्टेन्शन दिलं जावं. अजून निर्णय झालेला नाही”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
“मी घाबरणार नाही”
दरम्यान, एनसीबीकडून फक्त समीर खान याच्याच जामिनाविरोधात अपील करण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी आक्षेप घेतला. “मुख्य आरोपी करन सजनानी आहे. ६ आरोपी आहेत. मग फक्त समीर खानच्याच विरोधात अपील का केली गेली? करण सजनानीच्या घरून हा माल पकडला गेला. गांजा म्हटले, पण तंबाखू होती. राहिला फर्नीचरवालाच्या विरोधात अपील केली नाही. फक्त समीर खानच्या विरोधात अपील करून प्रसिद्धीचा खेळ सुरू केला गेला. हे सगळं मला घाबरवण्यासाठी हे सगळं केलं जातंय”, असं नवाब मलिक म्हणाले.
“जर एनसीबी प्रोफेशनल यंत्रणा आहे, तर त्यांना सांगावं लागेल की फक्त समीर खानविरोधातच अपील का केली गेली? नवाब मलिक तुम्हाला घाबरणारा नाही. तुमच्या फर्जीवाड्याला उघड करण्याचं काम केलं जाईल”, असं नवाब मलिक म्हणाले.