आर्यन खान ड्रग्ज प्रकरणावरून गेल्या महिन्याभरात राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून नवाब मलिक आणि एनसीबी यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये एनसीबीमधल्या चार अधिकाऱ्यांवर निशाणा साधला आहे. या अधिकाऱ्यांना नियंत्रणात आणण्याचा सल्ला एनसीबीला देतानाच नवाब मलिक यांनी या प्रकरणात न्याय झाल्याशिवाय आपण थांबणार नसल्याचा देखील निर्धार यावेळी बोलून दाखवला.

“वानखेडेनं शहराला पाताललोक बनवलंय”

समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर आज देखील पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंना लक्ष्य केलं आहे. “वानखेडेनं या शहराला पाताललोक बनवून ठेवलंय. कुणी म्हणेल नवाब मलिक एनसीबीशी, भाजपाशी लढतोय. मी त्यांच्याशी लढत नाही. मी चुकीच्या लोकांच्या विरोधात लढतोय. या शहरात ड्रग्जच्या नावाखाली हजारो कोटींचा धंदा होत आहे. मोठ्या लोकांना घाबरवरून त्यांच्याकडून वसूली केली जात आहे. आर्यन खानचं अपहरण झालं. खंडणी मागितली गेली. पण एक सेल्फी व्हायरल झाल्यामुळे पूर्ण खेळ बिघडला”, असं नवाब मलिक म्हणाले.

“फ्रॉड लोकांना वाचवू नका”

नवाब मलिक यांनी यावेळी एनसीबी आणि भाजपाला फ्रॉड लोकांना वाचवू नका असं आवाहन केलं आहे. “मी काही राजकीय लढा देत नाहीये. पण ड्रग्जचं रॅकेट उद्ध्वस्त व्हायला हवं. मोठे मासे पकडले जावेत. पण अशा प्रकारच्या फ्रॉड लोकांना वाचवण्यासाठी पुढे येऊ नका. मोहीत कंबोज, सुनील पाटील, मनीष भानुशाली, धवल भानुशालीला वाचवू नका. असे फ्रॉड लोक राजकीय पक्षांच्या मागे लपून चुकीच्या गोष्टी करतात. हजारो कोटींची खंडणी उकळत आहेत”, असा आरोप मलिक यांनी केला.

“एनसीबीनंही मुंबईच्या झोनल ऑफिसातल्या चांडाळ चौकडीवर लक्ष ठेवावं. समीर वानखेडे, व्ही. व्ही. सिंग, आशिष रंजन आणि वानखेडेचा ड्रायव्हर माने या चांडाळ चौकडीने पूर्ण विभागाचं नाव खराब करून ठेवलं आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन एसआयटी तयार झाल्या आहेत. यात अपहरण आणि खंडणीचा प्रकार तर सिद्ध झाला आहे. हळूहळू वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. या प्रकरणात गोसावी, भानुशाली, सुनील पाटील, प्रभाकर सईल, वानखेडे, व्ही. व्ही. सिंग यातलं कुणीही दोषी असेल तर त्याला शिक्षा व्हायला हवी”, असं नवाब मलिक यावेळी म्हणाले.

“सत्य समोर येईल. जोपर्यंत या विषयाचा शेवट होत नाही, तोपर्यंत मी थांबणार नाही. घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, धमकावण्याचा प्रयत्न करू नका. हा काही दोन इंटरव्हलचा चित्रपट नाही. जोपर्यंत यातला व्हीलन तुरुंगात जात नाही. तोपर्यंत हे संपणार नाही. माझ्याविरुद्ध कुणाला काय करायचंय करून घ्यावं. कितीही खोडं बोललात, तरी सत्यच जिंकणार आहे”, असं देखील नवाब मलिक म्हणाले.

Story img Loader