राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मुळात नवाब मलिक तुरुंगातून बाहेर आले तेव्हा त्यांचा मूळ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष झाले होते. तेव्हा नवाब मलिक नेमके कोणत्या गटात जाणार, याबाबत बराच काळ संभ्रम व जैसे थे स्थिती होती. त्यानंतर आता त्यांच्या उमेदवारीवरूनदेखील उत्सुकता ताणली गेली आहे. अणुशक्तीनगर हा नवाब मलिक यांचा हक्काचा मतदारदसंघ असताना तिथून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षानं त्यांची मुलगी सना मलिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता नवाब मलिकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या तिकिटावर अणुशक्तीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं बोललं जात होतं. मात्र, गुरुवारी दिल्लीत यासंदर्भात महायुतीच्या वरीष्ठ नेत्यांची सविस्तर चर्चा झाल्यानंतर अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक यांना तिकीट देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा चालू आहे. याच पार्श्वभूमीवर आता नवाब मलिक यांचा हक्काचा मतदारसंघ त्यांच्या मुलीला गेल्यानंतर ते निवडणूक लढवणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर खुद्द सना मलिक यांनी दिलेल्या उत्तरामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
अणुशक्तीनगर नाही, मग मानखुर्द-शिवाजी नगर?
अणुशक्तीनगरचा पर्याय बंद झाल्यानंतर नवाब मलिक मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून नशीब आजमावण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. २००९ मध्ये नवाब मलिक अणुशक्तीनगरमधून विजयी झाले होते. २०१४ मध्ये शिवसेनेच्या तुकाराम कातेंनी त्यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये नवाब मलिक यांनी मानखुर्द-शिवाजी नगर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता. आता यावेळी हे दोन्ही नेते अणुशक्तीनगरमधून निवडणूक लढवत नसल्यामुळे राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे.
उमेदवार | २०१९ | २०१४ | २००९ |
नवाब मलिक | ६५,२१७ मतं | ३८,९५९ मतं | ३८,९२८ मतं |
तुकाराम काते | ५२,४६६ मतं | ३९,९६६ मतं | ३२,१०३ मतं |
नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत काय म्हणाले फडणवीस?
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत त्यांची मुलगी सना मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची उमेदवारी मिळाल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना सना मलिक यांनी हे विधान केलं. “जनता आमच्यासोबत आहे. त्यामुळे समोर कुणीही रिंगणात उतरलं, तरी मला त्यामुळे काही फरक पडणार नाही. आम्ही अजित पवारांसोबत आहोत आणि अजित पवार आमच्यासोबत आहेत. नवाब मलिकांबाबत सध्या वेट अँड वॉच. पण ते निवडणूक लढवणार आहेत”, असं सना मलिक म्हणाल्या आहेत.
मलिकांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध?
दरम्यान, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात भारतीय जनता पक्षाकडून नवाब मलिक यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. आत्ताही नवाब मलिक जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्याबाबत भाजपाचा विरोध असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. “नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत आम्ही अजित पवारांशी सविस्तर बोललो आहोत. त्याामुळे ते योग्य तो निर्णय घेतील”, असं सूचक विधान बावनकुळेंनी केलं आहे. त्यामुळे मलिकांच्या उमेदवारीवरून तर्क-वितर्क वाढले आहेत.