मुंबई : नागपाडा परिसरातून जप्त केलेल्या ३१ किलो वजनाच्या मेफेड्रोन (एमडी) प्रकरणी महिन्याभरापासून शोध सुरू असलेल्या सुफियान खानला अखेर वाशीतून अटक करण्यात अमलीपदार्थ नियंत्रण विभागाला (एनसीबी) यश आले. याप्रकरणात जप्त करण्यात आलेल्या एमडीची किंमत ६० कोटी रुपये असून याप्रकरणी २६ जून रोजी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी आरोपींकडून रोख ६९ लाख रुपये जप्त करण्यात आले होते.

नागपाडा, डोंगरीस्थित मुशरफ जे.के एमडीची विक्री करीत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. याप्रकरणी २६ जून रोजी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली होती. मुशरफ मोठ्या प्रमाणात एमडी घेऊन येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्याकडून १० किलो एमडी जप्त करण्यात आले होते. चौकशीत एमडीचा आणखी साठा ठेवल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्यानुसार छापा टाकून नौशीन नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी तिच्या घराच्या झडतीमध्ये आणखी साडेदहा किलो मेफेड्रोन आणि रोख ६९ लाख १३ हजार रुपये जप्त करण्यात आले. हे एमडी सैफ नावाची व्यक्ती विविध ठिकाणी वितरीत करणार होती. त्याला मुंबईतील वडाळा परिसरात ताब्यात घेऊन ११ किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. याप्रकरणात सुफियान खानचा सहभाग असल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार एसीबीचे पथक त्याच्या मागावर होते. पण आरोपी महिन्याभरापासून पळ काढत होता. सोमवारी आरोपी वाशी येथील लॉजमध्ये असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानुसार तेथे छाटा टाकून आरोपीला अटक करण्यात आली. त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालायने त्याला एनसीबी कोठडी सुनावली.

हेही वाचा…२६३ कोटींचे प्राप्तिकर गैरव्यवहार प्रकरण : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पतीसह तिघांविरोधात आरोपपत्र, आरोपपत्रात तीन कंपन्यांचाही समावेश

सुफियान खानविरोधात अंमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे यापूर्वीही दाखल आहेत. तो या तस्करी प्रकरणातील महत्त्वाचा आरोपी आहे. सुफियान खान हा शिवडी परिसरात अमली पदार्थ वितरणाचे काम करतो. त्याच्या चौकशीतून याप्रकरणात अधिक माहिती मिळू शकेल, असा विश्वास अधिकाऱ्याने व्यक्त केला.