बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणात त्याची पुढील कोठडी मागणार नाही असे म्हटले आहे. रविवारी मुंबईतील न्यायालयाने आर्यन खानला एक दिवसासाठी एनसीबीच्या कोठडीत पाठवले. त्यानंतर सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आर्यन खानला सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावली जाईल तेव्हा त्याचे वकील त्याच्या जामिनासाठी अर्ज करतील. आर्यन खान व्यतिरिक्त, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि दुसरी आरोपी मुनमुन धामेचा यांना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी ड्रगच्या प्रकरणात कथित सहभागासाठी अटक केली होती. आर्यन खानला रविवारी दुपारी २ वाजता बंदी घातलेल्या पदार्थाचे सेवन, विक्री आणि खरेदीमध्ये गुंतल्याबद्दल अटक करण्यात आली.

एनसीबीने एका निवेदनात म्हटले आहे की, “तीन आरोपींना न्यायालयीन कोठडीसाठी उद्या (सोमवारी) पुन्हा न्यायालयात हजर केले जाईल. उर्वरित ५ आरोपी, नुपूर सतिजा, इश्मीत सिंग चड्ढा, मोहक जयस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत चोकेर यांना रविवारी अटक करण्यात आली.

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर लेखी निवेदनात, आर्यन खानने आपली अटक स्वीकारत म्हटले की, “मला माझ्या अटकेची कारणे समजली आहेत आणि मी माझ्या कुटुंबीयांना कळवतो.”

‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली आणि एकाला ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांना ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात आणले आणि त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb aryan khan police custody lawyers file for bail abn