मुंबई : अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये १३५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले. या कारवाईत सुमारे सात किलो कोकेन, सुमारे २०० किलो प्रतिबंधित अल्प्राझोलम जप्त करण्यात आले असून या कारवाईमध्ये तीन परदेशी नागरिकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सीमाशुल्क विभागातील सोने स्वस्तात देण्याच्या नावाखाली सुमारे १० कोटींची फसवणूक, तोतया सरकारी वकील महिलेसह चौघांविरोधात गुन्हा

परदेशातून मुंबईत अंमलीपदार्थ आणून त्याचे दिल्ली, हैदराबाद, गोवा व बंगळुरू येथे वितरण करणारी आंतरराष्ट्रीय टोळी सक्रिय असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे खारघरमध्ये राहणाऱ्या नायजेरियन नागरिकांची माहिती घेण्यात आली. त्यात पॉल इकेना ऊर्फ बॉसमन नावाच्या नायजेरियन नागरिकांची माहिती एनसीबीला मिळाली. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यानंतर पॉलला सप्टेंबर महिन्यात ताब्यात घेण्यात आले. त्यात एक किलो ९५९ ग्रॅम कोकेन सापडले. त्याच्या चौकशीत गुजरातमधील दोन व्यक्तींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्या माहितीच्या आधारे साकीर आणि सुफियान या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी अंमलीपदार्थ विक्रीतील रक्कम बेकायदेशिररित्या व्यवहारात आणण्यासाठी मदत करणाऱ्या बँक व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली. पॉलला यापूर्वी १९८९ मध्ये एनीबीने हेरॉईन तस्करीप्रकरणी अटक केली होती. २००१ मध्ये त्याला ११ किलो हेरॉईन प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हेही वाचा >>> मुंबई : बेस्टच्या ‘चलो कार्ड’च्या तुटवड्यामुळे प्रवाशांची गैरसोय, उपक्रमातील अधिकाऱ्यांचे मात्र मौन

आणखी एका कारवाईत साओ पाओलो येथून मुंबईत आलेली महिला एव्हलिना अल्वारेझ ए हिच्याकडे अंमलीपदार्थ असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. ती बोलिव्हियामधील नागरिक आहे. या माहितीच्या आधारे १२ ऑक्टोबरला ती राहत असलेल्या हॉटेलमध्ये जाऊन एनसीबीच्या पथकाने केलेल्या कारवाईत तिच्याकडे दोन किलो १८० ग्रॅम कोकेन सापडले. यावेळी परदेशी नागरिक असलेल्या ग्लोरिया इलोर्का हिलाही अटक करण्यात आली. तिसऱ्या कारवाई पुण्याजवळील शिरूर येथे एनसीबीने एक वाहन अडवून तपासणी केली असता त्यात संशयास्पद भुकटी सापडली. त्यानंतर वाहन ज्या ठिकाणी जात होते. तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे काऱखान्याची शेड असल्याचे एनसीबीच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. तेथील प्रयोगशाळेत पाहणी केली असता १७३ किलो ३५० ग्रॅम अल्प्राझोलम आणि अल्प्राझोलम उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कच्च्यामालाचा साठा सापडला. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत आंबेगाव येथे आणखी एक प्रयोगशाळा असल्याचे निष्पन्न झाले. तेथेही सुमारे २६ किलो अल्प्राझोलम सापडले. याप्रकरणी हैदराबाद येथे अल्प्राझोलमची विक्री करण्यासाठी गेलेल्या एकाला पकडण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncb busts major drug rackets in mumbai seized cocaine alprazolam worth rs 135 cr mumbai print news zws