मुंबई : अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गेल्या काही वर्षांत मुंबई आणि आसपासच्या परिसरातून जप्त केलेले ५,४८५ किलो अमली पदार्थ शुक्रवारी नष्ट केले. नवी मुंबईतील तळोजा येथे नष्ट करण्यात आलेल्या या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे ५२ कोटी रुपये असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात अनेक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यात परदेशी नागरिकांचाही समावेश आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उच्च दर्जाचे अमली पदार्थ नष्ट करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीत एनसीबीसह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या समितीने प्रकरणांचा आढावा घेऊन ८ आणि ९ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड, तळोजा, महाराष्ट्र येथे अमली पदार्थांचा साठा नष्ट केला.
जप्त करण्यात आलेल्या सुमारे १० किलो कोकेनचा त्यात समावेश होता. दरम्यान, यापूर्वी करण्यात आलेल्या कारवाईत अनेक परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. हे अमली पदार्थ प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतून तस्करी करून भारतात आणले होते. या कारवाईदरम्यान ५२ हजार १३० खोकल्याची औषधे नष्ट करण्यात आली. या बाटल्या धारावी परिसरातून जप्त करण्यात आल्या होत्या. या कारवाईत एकूण ५,४७९ किलो अमली पदार्थांचा साठा नष्ट करण्यात आला.
© The Indian Express (P) Ltd