मुंबई : अमलीपदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) मुंबई पथकाने ठाण्यातील कल्याण – शिलफाटा व नवी मुंबईतील खारघर येथे कारवाई करून सव्वा किलो चरससह एका आरोपीला अटक केली. याप्रकरणात रोख ४० लाख रुपये आणि ९७० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. याबाबत एनसीबी अधिक तपास करीत आहे.
हेही वाचा – मुंबई : चॉकलेटचे आमिष दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार; ७३ वर्षीय आरोपी अटकेत
मुंबईत अमलीपदार्थ विक्रीप्रकरणी तपास करीत असताना खारघर येथील रहिवासी एम. खान चरस विक्रीत सक्रिय असल्याचे आणि तो मुंबईत अमलीपदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. आरोपीने अमलीपदार्थ आणून कल्याण – शिलफाटा येथील दुकानात लपवल्याचे एनसीबीला समजले. त्यानुसार खानच्या दोन दुकानांसह गोदामाची झडती घेण्यात आली. तेथून एक किलो १०० ग्रॅम चरस आणि रोख सात लाख रुपये जप्त करण्यात आले. त्यानंतर खानला ताब्यात घेण्यात आले. एनसीबीने तात्काळ त्याच्या खारघर येथील घरी शोध मोहीम राबविली. तेथून ७० ग्रॅम चरस व रोख ३३ लाख ४५ हजार रुपये, तसेच ९७० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. चरस विक्रीतून रोख रक्कम व सोने खरेदी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. आरोपी इतर राज्यातून चरस मागवून मुंबई व परिसरात त्याची विक्रीत करीत होता. याबाबत एनसीबी अधिक तपास करीत आहे.