एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी मुस्लीम असूनही अनुसूचित जातींसाठीच्या आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच, बॉलिवुड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीवरून देखील नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात एकीकडे समीर वानखेडेंची विभागीय चौकशी सुरू असतानाच आता समीर वानखेडेंनी आरोपांविरोधाच थेट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे दाद मागितली आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांबाबत तक्रार करतानाच त्रास दिला जात असल्याचा देखील दावा समीर वानखेडेंनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी समीर वानखेंडेंनी मुस्लीम असून देखील अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणाचा लाभ घेतल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. याच मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असून समीर वानखेडे मुस्लीम आहेत किंवा नाहीत, यावरून दोन्ही बाजूंन दावे-प्रतिदावे केले जात आहेत.
एकीकडे समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून हिंदूच असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये स्वत: समीर वानखेडे, त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी सातत्याने मुस्लीम असल्याचे दावे खोडून काढले आहेत. मात्र, दुसरीकडे समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचे वडील आणि त्यांचा पहिला निकाहनामा पढणारे काझी यांनी ते मुस्लीमच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणावरून मोठा वाद सुरू झाला आहे.