मुंबईः अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) डोंगरी परिसरात केलेल्या कारवाईत २० किलो मेफेड्रोन (एमडी) जप्त केले. याप्रकरणी महिला तस्करासह तिघांना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अंमलीपदार्थांची किंमत ५० कोटी रुपये असून, या छाप्यात एक कोटी १० लाख रुपयांची रोख रक्कम व १८६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले.
दाऊद टोळीच्या उलाढालींचे प्रमुख केंद्र असलेल्या डोंगरी परिसरात मेफेड्रोनचे वितरण करणारी टोळी कार्यरत असून ती मुंबई व परिसरात त्याचे वितरण करीत असल्याची माहिती मुंबई एनसीबीला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक अमित घावटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने परिसरात पाळत ठेवली. खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे एन. खान ही व्यक्ती अंमलीपदार्थांच्या वितरणात सक्रिय असून लवकरच मेफेड्रोनचा मोठा साठा येणार असल्याचे अधिकाऱ्यांना समजले.
एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी एन. खान याच्या डोंगरीमधील मुक्कामाच्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी त्याचा साथीदार ए. अली परिसरातच उपस्थित असल्याचे लक्षात आले. थोड्याच वेळात त्यांच्याकडे अवैध अंमलीपदार्थ असल्याचे समजल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून तीन किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एन. खानच्या घराची झडती घेतल्यानंतर आणखी दोन किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले. एन. खानची चौकशी केली असता डोंगरीमधील ए. एफ. शेख नावाच्या महिलेचा यात सहभाग असल्याचे उघडकीस आले. तिनेच अंमलीपदार्थांचा साठा खानला पुरवल्याचे निष्पन्न झाले.
एनसीबीच्या पथकाने तात्काळ संबंधित महिलेच्या घरी छापा टाकला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या घरात १५ किलो मेफेड्रोन सापडले. त्याचबरोबर शोध मोहिमेत तिच्या घराच्या आवारात लपवून ठेवलेले एक कोटी १० लाख २४ हजार रुपये रोख व १८६ किलो ६०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सापडले. चौकशी केली असता सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. पण कसून चौकशी करताच रोख रक्कम अंमलीपदार्थांच्या विक्रीतून मिळाल्याचे आणि काही रकमेतून दागिने खरेदी केल्याचे तिने कबुल केले. तिच्याकडे काही संशयित कागदपत्रे सापडली असून, तीही जप्त करण्यात आली.
हे तिघेही गेल्या सात ते १० वर्षांपासून अंमलीपदार्थांच्या तस्करीत सक्रिय असल्याचे आरोपींच्या चौकशीत उघड झाले. महिला आरोपी शेखचे जाळे अनेक शहरांमध्ये पसरले असून ती कोट्यवधी रुपयांच्या अंमलीपदार्थांची नियमीत विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. तस्करी व त्यातील आर्थिक व्यवहार सुरळीत व्हावे यासाठी महिला आरोपी एक कंपनी चालवत होती. याप्रकरणी अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या तिघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी एनसीबी अधिक तपास करीत आहे.