मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे(अजित पवार) भायखळा विधानसभा तालुका अध्यक्ष सचिन कुर्मी ऊर्फ मुन्ना(४५) यांची शुक्रवारी मध्यरात्री हत्या करण्यात आली. दोन ते तीन संशयितांनी धारदार हत्याराने त्याची हत्या केल्याचा संशय असून याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भायखळा येथील रेतीवाला इंजस्ट्रीज समोरील अनंत पवार मार्गावर शुक्रवारी मध्यरात्री एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानुसार तेथे जवळच असलेल्या काळाचौकी पोलीस ठाण्याच्या मोबाइल व्हॅनला घटनास्थळी पाठवण्यात आले. त्यावेळी त्यांनी कुर्मी यांना तात्काळ जे.जे. रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मानेवर, हातावर, पोटावर व छातीवर गंभीर जखमा आहेत. त्यामुळ त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दोन ते तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय आहे. भायखळा येथील म्हाडा कॉलनीच्या मागच्या बाजूला हा प्रकार घडला. एका पादचाऱ्याने घटनेची माहिती देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी केला होता. दरम्यान, हा हल्ला का करण्यात आला त्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.