मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका फेब्रुवारी-मार्चमध्ये होण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) तयारी चालवली आहे. या पार्श्वभूमीवर १८ व १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे चिंतन शिबीराचे आयोजन केले असून, पक्षाचा पुढील सहा महिन्यांचा कार्यक्रमही घोषित केला जाणार आहे. पक्षाच्या विविध आघाड्यांची बैठक शुक्रवारी प्रदेश कार्यालयात पार पडली. या वेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व खासदार सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
शिबिराला राज्यातील २५० ते ३०० पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी पक्षाचे सामाजिक, क्रीडा व सांस्कृतिक धोरण पुढे नेण्यासंदर्भात चर्चा होईल. विविध अभ्यासक, विश्लेषकांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात कार्यक्रम निश्चित केला जाणार आहे, असे तटकरे यांनी पत्रकारांना सांगितले. छगन भुजबळ हे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्यावर खासदार तटकरे म्हणाले की, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्याशी पक्ष यासदंर्भात चर्चा करेल. कोकणात नाणार येथील प्रस्तावित हरित तेलशुद्धीकरण प्रकल्पासंदर्भात महायुतीच्या सरकारला धोरण नव्याने निश्चित करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…शिवाजी पार्कच्या धुळीला आता राजकीय रंग; मातीने भरलेले मडके देऊन मनसेने केला निषेध, आंदोलनाचा इशारा
महायुतीची साथ सोडणार नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी दबावाशिवाय होण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. यापेक्षा पक्षाची भूमिका वेगळी नाही. पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या मातोश्रींनी पवार कुटुंबीय एकत्र येण्यासंदर्भात विठ्ठलास साकडे घालणे त्यांची नैसर्गिक भावना आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत लोक चर्चा करतात. मात्र आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महायुतीची साथ कदापी सोडणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.