आरे वसाहतीमध्ये होऊ घातलेल्या कारशेडविरोधात नेहमीप्रमाणे रविवार पर्यावरणप्रेमींनी आंदोलन केले. आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झालेले आरेवासीय आणि पर्यावरणप्रेमींनी राज्य सरकार, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनविरोधात (एमएमआरसी) निदर्शने केली. आरे वसाहतीमधील पिकनिक पॉइंट सुरू असलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. ‘एमएमआरसीएल आरे छोडो, शिंदे-फडणवीस आरे छोडो’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी पिकनिक पॉईंट परिसर दणाणून सोडला होता.
राज्य सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीमध्येच उभारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर पर्यावरणप्रेमींनी आक्रमक भूमिका घेत विरोध करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दर रविवारी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉईंट परिसरात आरे संवर्धन गट आंदोलन करीत आहे. या आंदोलनात राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही सहभागी होऊ लागले आहेत.
आतापर्यंत युवा सेवाप्रमुख, माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर आदी नेते आरे आंदोलनात सहभागी झाले आहेत. आप आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते-कार्यकर्ते दर रविवारी येथील निदर्शनांमध्ये सहभागी होत आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या आंदोलनात उडी मारली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही रविवारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.