पक्षसंघटनेत बदल आणि मंत्रिमंडळात काही नवे चेहरे समाविष्ट करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी घेतले. प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांच्या जागी एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याची निवड केली जाणार असून, काही मंत्र्यांना नारळ दिला जाण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांची बैठक शरद पवार यांनी बोलाविली होती. लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने आढावा घेण्यात आल्यानंतर सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्याची सूचना करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या सर्व २० मंत्र्यांचे राजीनामे लिहून घेण्यात आले.  प्रदेशाध्यक्ष पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार आहे. पिचड यांच्या जागी प्रदेशाध्यक्षपदी बबनराव पाचपुते, आर. आर. पाटील किंवा जयंत पाटील यांपैकी एकाची नियुक्ती केली जाईल, अशी चिन्हे आहेत. पाचपुते यांनी यापूर्वीही प्रदेशाध्यक्षपद भूषविले असून, त्यांचीच पुन्हा वर्णी लावली जाईल, असाही मतप्रवाह आहे.
अजित पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे, डॉ. विजयकुमार गावित, गुलाबराव देवकर या मंत्र्यांच्या विरोधात विविध आरोप झाले होते. अजित पवार यांनी मागे राजीनामा दिला होता. पक्षाची प्रतिमा सुधारण्याकरिता पवार धक्कातंत्राचा अवलंब करतात याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळातील बबनराव पाचपुते, रामराजे नाईक-निंबाळकर व गुलाबराव देवकर यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यास आर. आर. पाटील किंवा जयंत पाटील यापैकी एकालाही मंत्रिमंडळातून मुक्त केले जाईल. रामराजे नाईक-निंबाळकर यांना वगळल्यास साताऱ्यातील शशिकांत शिंदे यांना संधी दिली जाईल.