पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने शिवसैनिकांनी मुंबईत ठिकठिकाणी पदपथावर अनधिकृतपणे शिववडापावच्या गाडय़ा उभ्या केल्या असून त्याचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या गाडय़ांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रावादीने आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे. यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
घाटकोपर परिसरातील खोत लेन, श्रद्धानंद रोड, नंदकिशोर जयरामजी लेन, एम. जी. रोड. जे.व्ही., मेट्रो पूल, तसेच घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणावर शिववडापावच्या गाडय़ा उभ्या करण्यात आल्या आहेत. वर्दळीच्या रस्त्यांवर उभ्या असलेल्या या गाडय़ांचा पादचाऱ्यांना त्रास होत आहे. या गाडय़ांविरुद्ध अनेक वेळा पालिका कार्यालयात तक्रारी करण्यात आल्या. अनेक वेळा कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. काही वेळा पालिका अधिकारी थातूरमातूर कारवाई करुन गाडय़ा सोडून देण्यात येतात. त्यामुळे पुन्हा त्याच जागेवर या गाडय़ा उभ्या असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या गाडय़ांविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रभाग क्रमांक १२० मधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रतीक्षा घुगे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
शिववडापावच्या गाडय़ांवर विकण्यात येणाऱ्या पदार्थाचा दर्जा तपासण्यात येत नाही. या पदार्थाचा दर्जा सुमार असतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. पालिका एकीकडे मुंबईकरांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र दुसरीकडे शिववडापावच्या गाडय़ाकडे डोळेझाक करीत आहे. सत्ताधारी पक्षच्या छत्राखाली या अनधिकृत गाडय़ा सर्रासपणे उभ्या आहेत. प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, असे प्रतीक्षा घुगे यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा