उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांवरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माफी मागितल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत हुशारीने खेळी करून विरोधकांना नमविले आणि विरोधकांनीही अजितदादांचा मुद्दा सोमवारी ताणून धरला नाही. परिणामी मुख्यमंत्र्यांनाही हस्तक्षेप करावा लागला नाही.
गेल्या आठवडय़ातील कामकाज अजितदादांच्या वक्तव्यावरील गोंधळात वाया गेले. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितल्याशिवाय कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला होता. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि गिरीष बापट यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला. प्रश्नोत्तराच्या तासात गोंधळ घालता येणार नाही  असे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी विरोधकांना सुनावले. शून्य प्रहरात या विषयावर चर्चा करता येईल, असे सांगत अध्यक्षांनी कामकाजाला सुरुवात केली. विरोधकांनी सभात्याग केला तरी प्रश्नोत्तराचा तास सुरू ठेवण्यात आला. प्रश्नोत्तराच्या पुस्तिकेतील सर्व १६ प्रश्न पुकारण्यात आले आणि ते पाऊस तासात संपले. प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्नच न उरल्याने १५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले.