राष्ट्रवादीचे भाजप नेत्यांकडून धिंडवडे; आता आमदार आक्रमक
केंद्र व राज्यात भाजप सत्तेत येताच राष्ट्रवादीने भाजपबाबत नेहमीच सौम्य भूमिका घेतली. राज्य विधानसभा निवडणुकीनंतर सरकारच्या स्थैर्याकरिता अगदी भाजपला बिनशर्त पाठिंबाही दिला होता. मात्र त्याच भाजपने राष्ट्रवादीला पुरते बदनाम केले असून, भाजपधुरिणांच्या भूमिकेने राष्ट्रवादीचे पार धिंडवडे निघाले आहेत.
भुजबळांप्रमाणेच अजित पवार आणि सुनील तटकरे यांनाही अटक होणार, अशी चर्चा भाजपने सुरू केल्याने राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी विधानसभेत सत्ताधारी भाजपने सारे खापर राष्ट्रवादीच्या नेत्यांवर फोडले. पक्षाचे आमदार आणि मंडळाचे माजी अध्यक्ष रमेश कदम यांनी मंडळाच्या पैशातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना आलिशान गाडय़ांचे वाटप केल्याचे सांगत समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावेही घेतली.
भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हात धुवून मागे लागले आहेत. भुजबळांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयात सोमय्या यांनीच पाठपुरावा केला होता. सोमय्या बोलतात आणि सरकारकडून कारवाई केली जाते, असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्षेप आहे. भुजबळांना अटक होणार अशी ओरड सोमय्या यांनी आधीच सुरू केली होती. अण्णा भाऊ साठे महामंडळातील भ्रष्टाचारप्रकरणीही सोमय्या यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर स्थिर सरकारसाठी भाजपला राष्ट्रवादीने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता. केंद्रत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला अनुकूल अशी भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वित्तमंत्री अरुण जेटली यांनी बारामतीमध्ये पवारांचा पाहुणचार घेतला. भाजपच्या जास्त जवळ जात असल्याने राष्ट्रवादीमध्येही अस्वस्थता होती. याच भाजपने आता राष्ट्रवादीची पुरती कोंडी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे यासाठी जास्त आग्रही आहेत. भाजपच्या गळ्यात गळे घालून काय मिळवले, असे राष्ट्रवादीचे आमदार आता खासगीत बोलू लागले आहेत. भाजपने वेगळा संदेश दिल्यानेच बहुधा अधिवेशनात जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, धनंजय मुंडे आदी आमदारांनी भाजपला लक्ष्य केले आहे.