मुंबई : राष्ट्रवादीत छगन भुजबळ, सुनील तटकरे, मधुकरराव पिचड हे ओबीसी किंवा आदिवासी समाजाचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. तसेच १९७७ मध्ये पुलोद सरकारमध्ये माझ्याबरोबर तेव्हाचे जनसंघाचे नेतेही होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील त्यामुळे त्यांना काही माहीत नसावे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून लगावला.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून ४० नेत्यांसह बाहेर पडून काँग्रेस फोडली व जनसंघाबरोबर सरकार स्थापन केले, हा इतिहास आहे. त्यावेळी मी प्राथमिक शिक्षण घेत होतो की जन्माला आलो नव्हतो, यामुळे इतिहास बदलत नाही, असे प्रत्युत्तर फडणवीस यांनी पवार यांना दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ओबीसी नेते हे दाखविण्यापुरतेच लागतात. जेव्हा महत्त्वाची पदे किंवा जबाबदाऱ्यांची वेळ येते, तेव्हा ती ओबीसी नेत्यांना दिली जात नाहीत. तसेच पवार यांनी ४० आमदारांसह सरकारमधून बाहेर पडून जनसंघाबरोबर सरकार स्थापन करणे, ही मुत्सद्देगिरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बाहेर पडून भाजपबरोबर सरकार स्थापन करणे, ही बेईमानी कशी, असा सवाल फडणवीस यांनी केला होता. त्यावर पवार यांनी फडणवीस यांना फटकारले.
आमच्या पक्षाने ओबीसी व विविध समाजांना महत्त्वाची पदे दिली आहेत. पहिले प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ हे ओबीसी समाजातील होते. पिचड वा तटकरे कोण होते? ही सगळी यादी जर दिली अर्थात त्यांचं वाचन किती आहे याची मला माहिती नाही, असा टोलाही पवारांनी फडणवीस यांना लगावला. १९७८ मध्ये आम्ही विविध पक्षांना एकत्र आणून पुलोदचा प्रयोग केला होता. तेव्हा जनता पक्षाच्या मदतीने सरकार स्थापन केले होते. जनता पक्षात तेव्हा जनसंघ घटक पक्ष होता. माझ्या सरकारमध्ये उत्तमराव पाटील उपमुख्यमंत्री तर हशू अडवाणी व अन्य सदस्य मंत्री होते. अज्ञानापोटी फडणवीस हे वक्तव्ये करीत असावेत. कारण त्यांना तेव्हाची फारशी कल्पना नसावी, असेही पवार यांनी सांगितले.
ओबीसी महामंडळाला केवळ ५५ कोटी -देशमुख
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ चेहरे दाखवण्यासाठी ओबीसी हवेत, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस आणि भाजपवर प्रतिहल्ला चढवला आहे. ओबीसी समाजाच्या महामंडळाला शिंदे-फडणवीस सरकारने केवळ ५५ कोटी दिले हे सरकार ओबीसी विरोधी आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केला.
देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना ओबीसी महामंडळाला २५० कोटी देण्यात आले. २०२२ मध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वसतिगृह देऊ, अशी घोषणा सरकारने केली होती. आता शैक्षणिक सत्र सुरू होत आहे तरी राज्यातील एकाही जिल्ह्यात हे वसतिगृह सुरू करण्यात आले नाही, याकडेही देशमुख यांनी लक्ष वेधले.
काँग्रेस फोडली हा इतिहास बदलत नाही- फडणवीस
शरद पवार यांनी १९७८ मध्ये वसंतदादा पाटील यांच्या सरकारमधून ४० नेत्यांसह बाहेर पडून काँग्रेस फोडली व जनसंघाबरोबर सरकार स्थापन केले, हा इतिहास आहे. त्यावेळी मी प्राथमिक शिक्षण घेत होतो किंवा जन्माला आलो नव्हतो, यामुळे इतिहास बदलत नाही, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांना दिले आहे. वसंतदादा पाटील यांचे सरकार पवार यांनी पाडले व काँग्रेस फोडली आणि भाजप म्हणजे तत्कालीन जनसंघाबरोबर सरकार स्थापन केले. त्यांनी बेईमानी केली, असे मी म्हटले नाही. शिंदे यांनी वास्तविक भाजपबरोबर युतीत निवडणूक लढविली होती आणि पवार यांनी काँग्रेसकडून लढविली होती. पवार यांनी ४० आमदारांसह सरकारमधून बाहेर पडून जनसंघाबरोबर सरकार स्थापन करणे, ही मुत्सद्देगिरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह बाहेर पडून भाजपबरोबर सरकार स्थापन करणे, ही बेईमानी कशी, असा सवाल फडणवीस यांनी केला होता.