कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील सांगली आणि सोलापुरातील काही गावांवर दावा सांगितला. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यातच आज ( ५ नोव्हेंबर ) महाराष्ट्रातील काही वाहनांवर बेळगाव-हिरेबागवाडी येथील टोल नाक्यावर ‘कन्नड रक्षण वेदिका संघटने’च्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. यानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही जणांची मला मेसेज केले आहेत. त्यात बेळगावची स्थिती अत्यंत गंभीर आहे. समितीच्या मुख्य कार्यकर्त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या कार्यालयासमोर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांची चौकशी आणि प्रत्येक रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली आहे. १९ डिसेंबरला कर्नाटक विधानसभेचं अधिवेशन अधिवेशन होणार आहे. त्यामुळे मराठी भाषिकांवर दहशतीचं वातावरण तयार करण्यात येत आहे. यासाठी तुम्ही येऊन धीर द्यावा,” असं एकीकरण समितीने मेसेज केल्याचं शरद पवारांनी सांगितलं.

हेही वाचा : महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक झाल्यानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना इशारा, म्हणाले “जर उद्या…”

“महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती निवळण्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. पुढील २४ तासांत परिस्थिती निवळली पाहिजे. नाहीतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यासाठी जबाबदारी राहतील. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून चिथावणीखोर भूमिका जर घडत असेल, तर देशाच्या स्थैर्याला मोठा धक्का असेल. केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही,” अशी कानउघडणी शरद पवार यांनी केली.

हेही वाचा : बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन, म्हणाले…

“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही, तर माझ्यासकट सर्वांना बेळगावात तेथील लोकांना धीर देण्यासाठी जावं लागेल. कर्नाटकाच्या सीमेवर हे घडत असेल तर लोकांचा उद्रेक होऊ शकतो. तो होऊ नये, हा आमचा प्रयत्न आहे,” असेही शरद पवार यांनी सांगितलं.