भाजपा पक्षात बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी प्रवेश केला. प्रवेश कऱणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते मधुकर पिचड, वैभव पिचड, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक तसंच काँग्रेसचे नेते कालिदास कोळंबकर यांचा समावेश होता. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान चित्रा वाघ यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिला असल्याचं यावेळी सांगितलं.

आपल्या पतीविरोधात चौकशी सुरु असल्याने आपण बॅकफूटवर आल्याचं वृत्त त्यांनी यावेळी फेटाळून लावलं. “मी माझी कोणतीही भूमिका बदललेली नाही. माझ्या नवऱ्यावर केस सुरु आहे त्याचा कोणताही परिणाम मी कामावर होऊ दिला नाही. आंदोलनं, मोर्चे बंद केले नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये माझ्यावर आंदोलन आणि मोर्च्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मी बॅकफूटवर आले असं म्हणणं चुकीचं आहे”, असं चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी मधुकर पिचड यांनी आम्हाला वाट दाखवणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो. यापुढे आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचं राजकारण करायचं आहे आणि त्याचमुळे माझ्यासहीत या सगळ्यांनीच भाजपात प्रवेश केला आहे असं सांगितलं. आम्हाला सगळ्यांना हा विश्वास आहे की यापुढेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप चांगलं काम करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पुढील वाटचाल करायची आहे असंही पिचड यांनी म्हटलं आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना टोला लगावला. “शरद पवार असे म्हणत आहेत की ईडीच्या कारवाईची धमकी देऊन पक्षांतर केलं जातं आहे मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही जेव्हा शिवसेनेतून गणेश नाईक, छगन भुजबळ यांना फोडले त्यांना अशीच धमकी दिली होती का? “,असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला. राईट पर्सन इन द राईट पार्टी हे आजचं भाजपातलं चित्र आहे असं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलं.

 

Story img Loader