शिवसेनेने भाजप सरकारमध्ये सहभागी होण्याचा अधिकृत निर्णय घेतल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने ठरविले आहे. विरोधी पक्षनेतेपद कसे पदरात पाडून घ्यायचे याची नेमकी व्यूहरचना आम्ही केली आहे, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. काँग्रेसला पुन्हा एकाकी पाडण्याची राष्ट्रवादीची ही चतुर खेळी असल्याचे मानले जात आहे.
तिसऱ्या क्रमांकाची सदस्यसंख्या असलेल्या काँग्रेसने आधीच विरोधी नेतेपदावर दावा सांगितला आहे. गुरुवारी सुनील तटकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार असल्याचे जाहीर केले. राष्ट्रवादीचे सदस्य संख्याबळ काँग्रेसपेक्षा कमी असताना, या पदावर आपण कसे दावा करता, असे विचारले असते, त्याची व्यूहरचना केली आहे, सभागृहात आवश्यक संख्याबळ सिद्ध केले जाईल, असे त्यांनी सांगितले. विधानसभेत काँग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादीचे ४१ सदस्य आहेत.
राष्ट्रवादीला भाजपची गरज
विधानसभेत बहुमताचे गणित जुळले असले तरी केंद्र आणि राज्यातील एकूण राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजप आणि राष्ट्रवादी या दोघांनाही परस्परांची गरज भासू शकते. यामुळेच शिवसेनेने सरकारला पाठिंबा दिला असला तरी राष्ट्रवादीचे महत्त्व कायम राहणार आहे. सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अवलंबून नाही हे निर्माण झालेले चित्र पुसण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यशस्वी झाले. छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्या विरोधातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीचा मार्गही खुला होऊ शकतो. पण भाजपचे दिल्लीतील नेतृत्व राष्ट्रवादीला एकदम अंगावर घेण्याची शक्यता नाही. सहा सदस्य असलेल्या राष्ट्रवादीचा पाठिंबा राज्यसभेत भाजपसाठी महत्त्वाचा आहे. संसदेच्या उभय सभागृहाचे संयुक्त अधिवेशन बोलावून महत्त्वाची विधेयके मंजूर करण्याची भाजपच्या धुरिणांची योजना आहे.
विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचाच अधिकार आहे.याबाबत सभागृहात अध्यक्ष काय भूमिका घेतात यावर पुढची गणिते अवलंबून आहेत.
-पतंगराव कदम, काँग्रेस नेते