नवी मुंबईत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करण्याचा निर्णय दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतल्याने पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून पाच अपक्षांच्या घोडेबाजाराला लगाम बसला आहे. काँग्रेसच्या दहा नगरसेवकांपैकी दोघांना पाच वर्षांत उपमहापौर पद व आठ जणांना विषय समित्यांचे सभापती पद देण्याचे ठरले आहे.
निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने अपक्षांवर अवलंबून राहण्याची वेळ आली होती. त्रिशंकू असलेल्या या स्थितीत पाच अपक्षांचा भाव वधारला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पाच अपक्षाचे पाठबळ असताना काँग्रेस बरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यांना पाच वर्षांतील उपमहापौर पद व आठ नगरसेवकांना एक वर्षांचे विषय समित्यांचे सभापती पद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेतील संख्याबळ राष्ट्रवादीचे ५२ व काँग्रेसचे १० असे आघाडीचे ६२ झाले असून अपक्षाचे पाच नगरसेवकही आघाडीबरोबर राहणार आहेत. त्यामुळे ही संख्या ६७ होत आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या आघाडीवर शिक्कामोर्तब केले .गणेश नाईक यांनी या तडजोडीला संमती दिली आहे. त्यामुळे पाच अपक्षांसह काँग्रेसच्या पांठिब्यावर सत्ता आपल्याकडे खेचण्याचे सेनेच्या नेत्यांचे मनसुबे धुळीस मिळाले आहे. ही आघाडी झाल्याचे नाईक यांनी आज झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत जाहीर केले. नाईक यांनी यावेळी अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांना महापौर करण्याचा निश्चय केला आहे. त्याला काँग्रेसच्या नगरसेवकांचा विरोध आहे. त्यामुळे सोनावणे यांना राष्ट्रवादीत सामील करुन त्यांना महापौर पद देण्याची व्यहूरचना रचल्याचे समजते.