महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढत असून ती १७० वर पोहोचण्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना नेत्यांना वाटत आहे. या दोन्ही पक्षांना पाठिंबा देणाऱ्या लहान पक्ष व अपक्षांची संख्या वाढत असून भाजपकडे असलेल्या काही आमदारांनीही संपर्क साधला असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी चुरस आहे.

शिवसेनेला मंजुळा गावीत, बच्चू कडू, राजकुमार पटेल, आशीष जैस्वाल आदी आठ आमदारांनी पाठिंबा दिल्याने त्यांचे शिवसेनेबरोबरच्या सदस्यांची संख्या ५६ वरून ६४ वर गेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आमदार निवडून आले असताना त्यांना चार आमदारांनी पाठिंबा दिला होता. त्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन महाविकास आघाडीस पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर असलेल्या सदस्यांची संख्या ६१ वर गेली आहे. भाजपचे १०५ सदस्य असून लहान पक्ष व अपक्षांचा पाठिंबा गृहीत धरून हे भाजपबरोबरच्या सदस्यांचे संख्याबळ १२० पर्यंत असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत हे संख्याबळ ११५ पर्यंत आले असून अन्य अपक्षांनीही शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा सुरू केली आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे अनुक्रमे ५६ व ५४ सदस्य असून त्यात केवळ दोनचा फरक आहे. शिवसेनेबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाठिंबा घेऊन येणाऱ्या आमदारांमध्ये भर पडत आहे.

यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, भाजपबरोबर असलेले काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीला पाठिंबा वाढत असून हे संख्याबळ १७० पर्यंत जाईल.

हितेंद्र ठाकूर यांचाही पाठिंबा

वसई : वसईतील बहुजन विकास आघाडीने नव्या महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पक्षाचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाने विविध घटक पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन केली होती. वसईतील बहुजन विकास आघाडी (बविआ) हा पक्ष या महाआघाडीत सामील झाला होता. बविआने पालघर जिल्ह्य़ात सेना-भाजप युतीला कडवी झुंज दिली होती. पालघर जिल्ह्य़ातील एकूण सहापैकी तीन जागा बविआने जिंकल्या होत्या.

Story img Loader