विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसने साताऱयातील त्यांचे आमदार रामराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. रामराजे निंबाळकर गुरुवारी सभापतीपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जर या पदासाठी अन्य कोणत्या पक्षाने उमेदवार दिला नाही, तर त्यांची निवड बिनविरोध होईल. मात्र, या निवडणुकीसाठी कॉंग्रेस आपला उमेदवार देणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादीनंतर कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. सभापतींची शुक्रवारी निवड होणार आहे.
विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव सोमवारी ४५ विरुद्ध २२ मतांनी मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले. सत्ताधारी भाजपच्या सदस्यांनी राष्ट्रवादीच्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. आता विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पुन्हा एकत्र येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अविश्वास प्रस्तावावरून शिवसेनेने आपल्या मित्रपक्षावर जोरदार टीका केली होती. त्याचबरोबर मतदानावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला होता. आता सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना काय भूमिका घेतात, याकडेही राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader