मालेगाव आणि समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटातील आरोपी स्वामी असीमानंद यांनी दिलेला कबुलीजबाब आणि एका नियतकालिकाला दिलेल्या कथित मुलाखतीप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत यांची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे, तर हा ‘शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार’ असल्याचे मत भाजपने व्यक्त केले आहे.
बॉम्बस्फोट व अन्य दहशतवादी घटनांमधील काही आरोपी पूर्वी संघाशी संबंधित होते किंवा त्यांच्याबाबत सरसंघचालकांना माहिती होती, असे असीमानंद यांनी एका मुलाखतीत सांगितल्याचा दावा एका नियतकालिकाने केल्याने त्यावरून राजकारण सुरू झाले आहे. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) किंवा सीबीआयकडून चौकशी करावी, असे मलिक यांनी पत्रकारांना सांगितले.
मात्र असीमानंद पोलिसांच्या ताब्यात असताना त्यांच्याकडून जबरदस्तीने कबुलीजबाब लिहून घेण्यात आला. तो कायदेशीरदृष्टय़ा वैध नाही. असीमानंद यांनीही त्याचा इन्कार केला असून न्यायालयानेही तो स्वीकारलेला नाही. असीमानंद यांनी तुरुंगात असताना मुलाखत देण्याचा प्रश्नच येत नाही, असे भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केले.
मालेगाव बॉम्बस्फोटाचा संघावर चिखलफेकीसाठी वापर
मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाचा वापर रा. स्व. संघावर चिखलफेक करण्यासाठी गेली काही वर्षे करण्यात येत आहे. तपासासाठी संघाचे पूर्ण सहकार्य असून आरोपपत्र दाखल करून खटला तातडीने निकाली काढावा. एकदा काय तो सोक्षमोक्ष लागल्यावर सत्य सर्वासमोर येईल. त्याऐवजी प्रत्येक वेळी काहीतरी नवीन मुद्दा उपस्थित करून संघाकडे बोट दाखविणे चुकीचे असल्याचे संघाचे कोकण प्रांत प्रचार विभागप्रमुख प्रमोद बापट यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

Story img Loader