गोव्यामध्ये टोल भरण्यावरून झालेल्या वादात नितेश राणे यांना अटक झाल्यावर त्यांच्या समर्थकांनी राज्यात ठिकठिकाणी तोडफोड करून केलेले नुकसान राणे यांच्याकडून वसूल करावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसने राणे यांना लक्ष्य केले.
राणे आणि राष्ट्रवादी यांच्यातील ‘मधुर’ संबंध सर्वश्रूत आहेत. यापूर्वीही राणे विरुद्ध राष्ट्रवादी यांच्यात अनेकदा खटके उडाले आहेत. कायदा हातात घेणे मुळात चुकीचे आहे. नितेश राणे यांनी कायदा हातात घेतला असल्यास ते चुकीचेच आहे. त्यांच्या अटकेनंतर मुंबई आणि कोकणात तोडफोड करण्यात आली. या हिंसक कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असून नव्या कायद्यानुसार स्वाभिमान संघटनेकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.
माणिकराव ठाकरे ‘शेखचिल्ली’
तीन जिल्हा परिषदांमध्ये यश मिळाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हुरळून गेले व त्यांना राष्ट्रवादी संपली असा भास होऊ लागला. ठाकरे यांची अवस्था शेखचिल्लीसारखी असल्याची टीका मलिक यांनी केली. त्यावर नाव नवाब पण भाषा फकिराची, असे प्रत्युत्तर काँग्रेसच्या वतीने देण्यात आले.
राष्ट्रवादीच्या वतीने राज्यात २२ जागा लढविण्यात येणार असून, या मतदारसंघांमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्याकरिता प्रत्येक मतदारसंघांमध्ये निरीक्षक पाठविण्यात आले आहेत. हे निरीक्षक पुढील महिन्यापर्यंत अहवाल सादर करतील, असेही सांगण्यात आले.

Story img Loader