दिल्ली पोलिसांनी श्रीशांतसह तीन क्रिकेटपटूंना मॅचफिक्सिंगवरून अटक केली तेव्हा मुंबई पोलिसांच्या निष्क्रियतेवरून बरीच टीका झाली होती. पण नंतर मुंबई पोलीस सक्रिय झाल्याबद्दल तर्कवितर्क व्यक्त केले जात होते. त्यामुळे मुंबई पोलिसांची सक्रियता आणि बीसीसीआयचे प्रमुख श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची राष्ट्रवादीने केलेली मागणी याचा काही संबंध आहे का, याचीच चर्चा सुरू झाली.
आयपीएलचे सामने आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाशी असलेल्या संबंधांमुळे मुंबई पोलीस याकडे कानाडोळा करीत असल्याचे बोलले जाऊ लागले. मात्र दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर मुंबई पोलीस सक्रिय होवून बुकी व बॉलिवूड नटाला अटक केली. त्यानंतर थेट बीसीसीआयचे प्रमुख श्रीनिवासन यांच्या जावयावर बेटिंगबद्दल संशयाचे वातावरण तयार केले. राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सक्रीयतेबाबतचे कोडे उलगडले.  शरद पवार यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शशांक मनोहर यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मनोहर यांची मुदत संपल्यावर श्रीनिवासन अध्यक्षपदी आले होते. पवार यांच्याशी बहुधा फाटल्यानेच राष्ट्रवादीने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असावी, अशी चर्चा आहे.

Story img Loader