मुंबई : ‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी निश्चितच शुभेच्छा आहेत. पण, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री आहेत आणि यापुढेही राहतील. अजितदादा जेव्हा मुख्यमंत्री होतील तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी संधी दिली जाईल’’, अशी गुगली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाकली. दुसरीकडे, अजित पवार गटाचे मंत्री धर्मराव आत्राम यांनी २०२४ मध्ये अजित पवार हे नक्की मुख्यमंत्री होतील, असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री धर्मराव अत्राम यांनी केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘‘जे नेते राजकारणात आहेत, त्या प्रत्येकाला कुठेतरी व कधीतरी संधी मिळणारच आहे. अजित पवार हे मोठे नेते आहेत. आमच्या शुभेच्छा निश्चितपणे त्यांच्या पाठिशी आहेत. पण, सगळय़ांनी वास्तविकता लक्षात घेतली पाहिजे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि आम्ही एकत्रितपणे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जेव्हा अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाईल तेव्हा त्यांना पाच वर्षांसाठी संधी दिली जाईल’’, असे फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्रीपदी शिंदे हेच कायम राहतील, असे एकीकडे सांगणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा दिल्याने भाजप नेत्यांची भविष्यातील राजकीय योजना काय आहे, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा >>>“…तर आम्ही सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ‘पर्मनंट’ करू”, प्रकाश आंबेडकरांची घोषणा

‘‘राज्याच्या राजकारणात भाजप हा मोठा भाऊ आहे. मात्र, २०२४ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होणार हे निश्चित आहे. देवेंद्र फडणवीस तसे बोललेही आहेत’’, असा दावा अन्न, औषध प्रशासन मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी केला. ज्यांचे संख्याबळ अधिक त्यांचा मुख्यमंत्री, असा काळ आता राहिलेला नाही. असे असले तरी आम्ही सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न करू. आगामी निवडणूक महायुती म्हणून लढू. त्यामुळे २०२४ मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही आत्राम यांनी व्यक्त केला.

‘याआधी कोणाला घाबरून आमच्याबरोबर यायला तयार होते?’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये आमच्याशी चर्चा केली होती आणि ते सरकारमध्ये येण्यास तयार होते. ते २०१७ मध्येही सरकारमध्ये सहभागी होणार होते. तेव्हा ते कोणत्या तपास यंत्रणांना घाबरुन येत होते, असा सवाल  फडणवीस यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते का बाहेर पडले, हे शरद पवार यांना नीट माहीत आहे. त्यांच्या मान्यतेनेच आमदारांनी स्वाक्षऱ्या करून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, हे अजित पवार यांनीही सांगितले होते. त्यामुळे आता हे नेते पक्षातून बाहेर पडल्यावर आरोप करणे अयोग्य आहे, असे फडणवीस म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp dharmarao aahram discussions about ajit pawar chief ministership mumbai amy