लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव तसेच निर्णय प्रक्रियेस होणाऱ्या विलंबाबद्दल स्वपक्षीयांनी केलेल्या तक्रारींमुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तेवढे खूश नसले तरी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नेतृत्व बदलासाठी केलेले दबावाचे राजकारणच पृथ्वीराजबाबांच्या उलट पथ्यावरच पडले. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात आधीच तेवढे सख्य नसले तरी अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे या उभयतांमधील कटुता आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.
मुख्यमंत्री चव्हाण यांच्या कार्यपद्धतीबद्दल पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील काही नेते खूश नाहीत. राज्य विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राबाबत वेगळा विचार दिल्लीच्या पातळीवर सुरू झाला होता. पण महाराष्ट्रासह आसाम आणि हरियाणा या तीन राज्यांमधील नेतृत्व बदलाची मागणी उफाळून येईल हे लक्षात घेता पक्षाने थोडी मवाळ भूमिका घेतली. महाराष्ट्रात नेतृत्व बदल केल्याशिवाय आगामी निवडणुकीत यश मिळणे कठीण असल्याचे चित्र राष्ट्रवादीच्या वतीने निर्माण करण्यात आले. ही बाब पवार यांनी ए. के. अॅन्टोनी यांच्या कानावर निकालानंतर लगेचच घातली होती.
राज्यात नेतृत्व बदल करण्याची आमची मागणी नाही, पण दिल्लीची तशी इच्छा दिसते, असे विधान पवार यांनी शुक्रवारी केले होते. तसेच आघाडीचे नेतृत्व आपणच करावे ही काँग्रेसची इच्छा असल्याचे बोलून दाखविले. शनिवारी दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या गाठीभेटींमध्ये मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या विधानाकडे लक्ष वेधले. राष्ट्रवादीचा आग्रह सुशीलकुमार शिंदे यांच्या नावासाठी होता. राष्ट्रवादीच्या कलाने घेतल्यास जागावाटपातही त्यांचा वरचष्मा राहील हा काँग्रेसमध्ये मतप्रवाह होता.
वेळही कमी
नेतृत्व बदल केल्यास नव्या मुख्यमंत्र्यांना वेळही कमी मिळणार आहे. ऑगस्टअखेर आचारसंहिता जाहीर होईल. म्हणजेच निर्णय प्रक्रियेसाठी ६५ दिवस मिळू शकतील. राज्यातील पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी अॅन्टोनी समितीपुढे राज्याची सुनावणी २८ तारखेला होणार आहे. यानंतर राज्यात नेतृत्व बदलाचा निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा असली तरी बदल करायचा असता तर लगेचच निर्णय झाला असता, असे काँग्रेसमध्ये बोलले जाते. सध्या तरी मुख्यमंत्र्यांना अभय मिळाला आहे.
..उपमुख्यमंत्री बदलणार का?
राज्यात मुख्यमंत्री बदलण्यासाठी राष्ट्रवादीचा अजूनही आग्रह आहे. मुख्यमंत्री बदलल्यास राष्ट्रवादीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बदलले जाईल का, अशी भूमिका काँग्रेसच्या वतीने घेण्यात आली होती. सिंचन घोटाळ्यामुळे अजितदादांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. मग त्यांनाही बदलण्यात यावे ही काँग्रेसची भूमिका होती.
राष्ट्रवादीचा दबावच पृथ्वीराजांच्या पथ्यावर!
लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभव तसेच निर्णय प्रक्रियेस होणाऱ्या विलंबाबद्दल स्वपक्षीयांनी केलेल्या तक्रारींमुळे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर तेवढे खूश नसले तरी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नेतृत्व बदलासाठी केलेले दबावाचे राजकारणच पृथ्वीराजबाबांच्या उलट पथ्यावरच पडले.
First published on: 23-06-2014 at 01:38 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp force helps out cm prithviraj chavan