आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची प्रकृती बिघडली आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, अनिल देशमुख आर्थर रोड जेलमध्ये चक्कर येऊन पडले. यानंतर त्यांची डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार असल्याने त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता ते अचानक चक्कर येऊन खाली पडले. यानंतर तेथील डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली. नंतर जे जे रुग्णालयात नेऊन त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. दोन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
अनिल देशमुख यांच्यावर नेमके आरोप काय?
अनिल देशमुख यांच्यावर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांनी १०० कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचे आरोप आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टानं या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईस सुरुवात केली होती. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून ४.७ कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला हे पैसे सोपवले.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार , त्याच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे.