मराठा आरक्षणावर एकीकडे राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांच्या रूपात ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पुढाकार घेतल्याने इतर मागासवर्गीय समाजाची नाराजी ओढवली जाण्याची शक्यता गृहीत धरून राष्ट्रवादीने तटकरे यांची बुधवारी प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. मराठा आरक्षणामुळे इतर मागासवर्गीय, दलित विरोधात जाण्याची भीती राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वच दृष्टीने ‘तगडा’ प्रदेशाध्यक्ष असावा आणि इतर मागासवर्गीय समाजाची मतेही मिळावीत म्हणून तटकरे यांची निवड झाली.
सलग दुसऱ्यांदा कोकणाकडे नेतृत्व
जाधव यांच्याऐवजी तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवून राष्ट्रवादीने लागोपाठ दुसऱ्यांदा कोकणाकडेच हे पद ठेवले आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात पक्षाला वाढीसाठी वाव उरला नसल्याची भावना आहे. कोकणात गेल्या निवडणुकीत ३९पैकी १० आमदार निवडून आले होते. त्यामुळे कोकणात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष कोकणलाच देण्यात आले.
भास्कर जाधव यांचा आज शपथविधी
प्रदेशाध्यक्षपदावरून दूर करण्यात आलेले भास्कर जाधव यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे. आज, गुरुवारी त्यांचा शपथविधी होईल. तटकरे यांच्याकडील जलसंपदा हे खाते त्यांच्याकडे सोपविण्यात येणार की नाही, याबाबत स्पष्ट झाले नाही.
मराठा शिक्का पुसण्यासाठी ओबीसी चेहऱ्याची निवड
मराठा आरक्षणावर एकीकडे राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने सुनील तटकरे यांच्या रूपात ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्षपद दिले.
First published on: 26-06-2014 at 01:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp gives obc face to avoid maratha label