‘कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद’ या निर्धाराने राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध क्लुप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहे. गेल्या निवडणुकीत पराभव झालेल्या मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना ताकद देण्याकरिता राज्यसभेचे खासदार आणि विधान परिषद आमदारांच्या निधीचा अत्यंत खुबीने वापर करण्यात येत असून गेल्या दीड वर्षांंत राष्ट्रवादीने तब्बल ५२ कोटी रुपये खर्च केले आहेत.
आगामी निवडणुकांचे नियोजन राष्ट्रवादीत सुरू झाले आहे. गेल्या वेळी पराभूत झालेले मतदारसंघ किंवा पुढील निवडणुकीत विजयाची शक्यता असलेले मतदारसंघ यांची यादी राष्ट्रवादीच्या धुरिणांनी तयार केली असून या मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या नेत्यांना ताकद देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेच्या खासदारांना त्यांचा विकास निधी कोठेही वापरता येतो. तसेच विधानसभेतून विधान परिषदेवर निवडून आलेल्या आमदारांना राज्यात कोठेही आमदार निधीतून कामे सुचविता येतात. खासदाराला वर्षांला पाच कोटींचा निधी उपलब्ध होतो.
यापैकी तीन कोटी पक्षाला देण्याचे बंधनकारक ठरविण्यात आले. राज्यसभेत राष्ट्रवादीचे सहा खासदार आहेत. दोन कोटींच्या आमदार निधीपैकी एक कोटी रुपये पक्षाला उपलब्ध करून देण्याची सूचना विधानसभेद्वारे विधान परिषदेवर निवडून आलेल्या पक्षाच्या १५ आमदारांना करण्यात आली.
आतापर्यंत राज्यात राष्ट्रवादीच्या खासदार-आमदारांच्या निधीतून ५२ कोटी रुपयांची कामे करण्यात आल्याचे या उपक्रमाचे समन्वयक व माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी  सांगितले. या निधीतून महिलांसाठी प्रसाधनगृहे व स्वच्छतागृहे, दिवाबत्ती, छोटी सभागृहे, जोडरस्ते, पाणीपुरवठा योजना आदी लोकोपयोगी कामे करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली. या मार्चअखेर आणखी १० ते १२ कोटींची कामे केली जाणार आहेत.
पक्षाचे ८० ते ९० उमेदवार कोणत्याही स्थितीत निवडून आणण्याचे लक्ष्य ठरवून मतदारसंघ निवडण्यात आले आहेत. शरद पवार यांनी जातीने त्यावर नजर ठेवली असून पक्षाकडे निधी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या दोन आमदारांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीच दीर्घकाळ राजकारण करायचे आहे ना, असा सूचक इशारा दिला आहे. पक्षाकडे उपलब्ध होणाऱ्या निधीचा वापर कसा करायचा हे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष पिचड आणि श्रीनिवास पाटील आदी नेते ठरवितात. या निधीतून केल्या जाणाऱ्या कामांचे पक्षाला सारे श्रेय मिळेल याची पुरेपूर खबरदारी घेतली जाते.

Story img Loader