आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. दुष्काळाच्या मुद्दय़ावर लोकांना मदत मिळाली पाहिजे यावर भर देतानाच नव्या औद्योगिक धोरणामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे हित साधले गेले पाहिजे, अशी भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी वर्गाला खूश करण्याबरोबर दुष्काळाने होरपळणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. नव्या औद्योगिक धोरणावरून काँग्रेसची पद्धतशीरपणे कोंडी करण्याची राष्ट्रवादीची खेळी असल्याचे पवार यांच्या भूमिकेवरून स्पष्ट होते.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक पवार यांच्या उपस्थितीत अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडली. दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आल्याचे पवार यांनीच सांगितले. नव्या औद्योगिक धोरणामुळे शेतकऱ्यांच्या संपादित केलेल्या जमिनींवर घरबांधणी होईल, अशी भीती बैठकीत व्यक्त करण्यात आली. ही जमीन विकसित करताना शेतकऱ्यांचे हित साधले गेले पाहिजे अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना १५ टक्के जमीन मिळाल्यास त्याचा फायदा होईल, असाही मतप्रवाह होता. त्यावर आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका मांडावी, अशी सूचना पवार यांनी केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेल्या बैठकीचे इतिवृत्त मंजूरीसाठी येईल तेव्हा सुधारणा सुचविण्यास पक्षाच्या मंत्र्यांना सांगण्यात आले.औद्योगिक धोरणाला होणाऱ्या विरोधाच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांची पुण्यात भेट घेऊन त्यांना सारी वस्तुस्थिती समजावून सांगितल्याचे समजते.
खासदारांची संख्या वाढविण्यासाठी मंत्र्यांना उमेदवारी ?
राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांना वगळण्याची पक्षाची योजना आहे. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यासाठी आग्रही आहेत. मात्र काँग्रेसच्या वतीने जेव्हा केव्हा विस्तार करता येईल तेव्हा बघू एवढेच पवार यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना पवार यांनी मात्र तशी योजना नसल्याचे सांगितले.
गुजरातवरून मुख्यमंत्र्यांना टोला
गुजरातमध्ये काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही म्हणून शरद पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. स्वबळावर लढण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला. त्यावर राष्ट्रवादीला विरोधात बसायचे आहे का, असा सवाल मुख्यमंत्री चव्हाण यांना केला होता. पवार यांचे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे गुजरातची जबाबदारी कधी सोपविली व राज्यातील प्रश्न सुटलेत का, अशा शब्दांमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांना फटकारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा