पोलिसांना करावा लागला हस्तक्षेप
उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून सर्व राजकीय पक्षांमध्ये आघाडी घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीवरून घोषणाबाजी, मारामारीमध्येही आघाडी घेतली. मुंबईत पक्षाची ताकद मर्यादित असली तरी दिंडोशी परिसरातील उमेदवारीवरून पक्षाच्या मुख्यालयात प्रचंड गोंधळ झाला व त्यातून हाणामारीपर्यंत वेळ गेली. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना पिटाळून लावले.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने ४५ उमदेवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली होती. बुधवारी निवडणुकीची घोषणा झाली आणि लगेचच दुसऱ्या दिवशी पक्षाच्या मुख्यालयात उमेदवारीवरून गोंधळ उडाला. मुंबई उपनगरातील दिंडोशी परिसरातील चार प्रभागांमध्ये उमेदवारीवरून आमदार विद्या चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष अनिल रावराणे यांच्यातील वादाला हिंसक वळण लागले. दोन्ही गटांचे कार्यकर्ते पक्षाच्या मुख्यालयात आपल्याच गटातील कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून जमले होते.
जिल्हाध्यक्ष रावराणे यांनी समर्थकांसह पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे समजताच विद्या चव्हाण यांनी समर्थकांना पाचारण केले. चव्हाण यांच्या समर्थनार्थ मोठय़ा प्रमाणावर महिला कार्यकर्त्यां जमल्या होत्या. जिल्हाध्यक्ष रावराणे यांच्या समर्थकांना उमेदवारी देऊ नये, अशी त्यांची मागणी होती. घोषणाबाजी आणि गोंधळ वाढल्याने माजी मंत्री जयंत पाटील आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वाढत गेला आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी सुरू झाली. तेव्हा दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले आणि हाणामारीचा प्रसंग उद्भवला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करीत घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर पिटाळले. महिला कार्यकर्त्यांना आवरण्याकरिता महिला पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. या गोंधळात काही जणांना मारही बसला.
रावराणे हे पक्ष विरोधी काम करतात, असा विद्या चव्हाण यांचा आरोप होता, तर चव्हाण या पक्षाऐवजी स्वत:च्या संघटनेला मोठे करतात, असे रावराणे यांचे म्हणणे आहे. गोंधळ शांत झाल्यावर जयंत पाटील आणि सचिन अहिर यांनी आमदार चव्हाण आणि रावराणे यांना एकत्र बसवून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
स्वबळावर लढणार
मुंबईत पक्षाची ताकद नाही, अशी टीका केली जाते. पण एका विधानसभा मतदारसंघातील चार प्रभागांच्या उमेदवारीवरून पक्षात किती स्पर्धा आहे हे स्पष्ट होते, असे सचिन अहिर यांचे म्हणणे आहे.