मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादीची उपेक्षा होऊ नये, यासाठी ८० ते ९० जागा देण्याच्या शब्दाची भाजपला आतापासूनच आठवण करून द्यावी, अशी अपेक्षा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. त्यावर भाजप हा मोठा भाऊ असल्याने अधिक जागा लढेल, मात्र मित्र पक्षांचा सन्मान ठेवला जाईल, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
हेही वाचा >>> राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी २५ जूनला पोटनिवडणूक; साताऱ्याला खासदारकी?
अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ आदी नेते यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वाट्याला अवघ्या चारच जागा आल्या. त्याचा उल्लेख करीत भुजबळ यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेसाठी जागावाटपाची खटपट होता कामा नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. ८० ते ९० जागा मिळाल्यास ५० ते ६० जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून येतील. सध्या ५० आमदार असल्याने तेवढ्याच जागा घ्या, हे मान्य करू नका, असे भुजबळांनी सुनावले. २०१९च्या निवडणुकीत निवडून आलेल्या जागांचा निकष केवळ आमच्यासाठी लावण्यात आला. विधानसभेत त्याची पुनरावृत्ती होता कामा नये, अशीही अपेक्षा भुजबळांनी व्यक्त केली. यावर पक्षाचा योग्य सन्मान राखला जाण्याबाबत खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांना द्यावे लागले. दुसरीकडे भुजबळांच्या अपेक्षेवर प्रतिक्रिया देताना भाजपच मोठा भाऊ असल्याने अधिक जागा लढवेल, मात्र शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही मित्र पक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.