भाजपा आमदार आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“संपूर्ण महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष भाजपा आहे. आज ज्या पद्धतीचं यश भाजपाला मिळालेलं आहे, हे अभूतपूर्व यश आहे. अजून आकडेवारी समोर येणार आहे. पुन्हा एकदा स्पष्टपणे सिद्ध झालं की क्रमांक एकचा पक्ष हा भाजपा आहे. मराठी माणसाच्या मतांवर, महाराष्ट्रातील नागरिकांच्या आशीर्वादाने हा क्रमांक एकचा पक्ष झालेला आहे. आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकरतो आणि जनतेची सेवा आणखी दुप्पट वेगाने करून असे आश्वस्त करतो.” तसेच, पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या यशाबद्दल बोलताना शेलार यांनी “राष्ट्रवादी काँग्रेस हा दोन अडीच जिल्ह्यांपुरताच पक्ष आहे. तो राज्यस्तरावरचा पक्षच नाही.” असं बोलून दाखवलं. तसेच, “काही लोक रात्री स्वप्न बघतात हे आम्हाला माहीत होतं. पण जयंत पाटील हे जर दिवसा स्वप्न पाहत असतील. तर ते दिवसा काम करतात की स्वप्न बघतात एवढाच आमचा त्यांना प्रतिप्रश्न आहे.” असं म्हणत जयंत पाटील यांच्या टीकेला प्रत्युत्तर देखील दिले.

आता तरी यांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करूया –

याशिवाय “आता पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे, ज्या मुद्द्याला घेऊन एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उठाव केला, की राष्ट्रवादी काँग्रेस बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवत आहे. संपवण्याचा घाट घातला आहे. हे आता आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. कारण, राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष झाला आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना क्रमांक चारचा पक्ष होतोय. हीच भीती, हाच संशय आणि आरोप एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारंवार उद्धव ठाकरेंकडे व्यक्त केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवू पाहतेय, संपवण्याचा घाट घातला आहे. आकडे आता बोलके आहेत. म्हणून आता तरी यांचे डोळे उघडतील अशी अपेक्षा करूया.” असं म्हणत यावेळी शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

शिवसेनेने त्यांचं ग्राहक संरक्षण कक्ष बंद करून, न्यायालय सहायता कक्ष करावं –

तर “दसरा मेळाव्यावरून शिवसेना न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे, यावर बोलताना शेलार म्हणाले न्यायालयात जाण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरूर न्यायालयात जावं. ज्या पद्धतीचे मागील काही महिन्यातील त्यांचे कार्यक्रमा आणि कार्यवाही आहे की प्रत्येक विधानसभेच्या विषयात, विधानसभेच्या बाहेरच्या विषयात न्यायालयात जायचं. त्यांना याप्रकरणातही न्यायालयात जायचं आहे. तर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांचं ग्राहक संरक्षण कक्ष बंद करून, न्यायालय सहायता कक्ष करावं. त्यातून काहीतरी पदरात पडेल अशी अपेक्षा आहे.” असं म्हणत शिवसेनेला टोला देखील लगावला.

..प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण आणत नाही –

“मुंबई भाजपाच्यावतीने आणि मुंबई बँकेच्या सहकार्याने भाजपाने सार्वजनिक गणेशोत्सवात गणेशोत्सवाची स्पर्धा मुंबईचा मोरया या नावाने गणेशोत्सव काळात संपूर्ण मुंबईत केली. या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सव काळात गणेश भक्तांची आणि नागरिकांची सहभागीता ही भाजपाकडेच होती. मला कोणालाही कमी दाखायचं नाही. परंतु कल कोणाकडे आहे हि दिसून येतं. पण प्रत्येक गोष्टीत आम्ही राजकारण आणत नाही. हा सण म्हणून सण साजरा करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या मर्यादा ज्या ठाकरे सरकारने घातल्या होत्या. ज्या बाजूला काढल्यानंतर लोकांची सहभागीता वाढली. उत्सव जोराने साजरा झाला. आता आम्ही घेतलेल्या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दादरच्या शिवाजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे.” असं यावेळी शेलार म्हणाले.

पाहा व्हीडीओ –

मुंबई महापालिकेत आजपर्यंत स्वार्थी लोकांनी राज्य केलं –

“मुंबई महापालिकेत स्वार्थी लोकांनी आजपर्यंत राज्य केलं. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा स्वार्थ होता तोपर्यंत मुंबई महापालिकेच्या कामात लक्ष दिलं, त्यांनी मुंबईकरांच्या उत्सवांकडे, उत्सवप्रेमी मुंबईकरांकडे लक्ष दिलं नाही. म्हणून उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेनेच्या माजी महापौर या आम्हाला टीव्हीवरच दिसल्या, मुंबईकरांसोबत सणासुदीच्या सहभागीतेमध्ये कधी दिसल्याच नाहीत. किंबहुना महापालिकेचा कार्यक्रम देखील आपण सत्तेत होत असल्यामुळे करण्याची देखील त्यांची भूमिका नव्हती. भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता या सणामध्ये सहभागी झाला. विशेषता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील भाजपाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आपलंस केलं.” असं यावेळी शेलार यांनी बोलून दाखवलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp is not a state level party limited to only two and a half districts ashish shelar msr