ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी येथून लढण्याचे आव्हान दिले आहे. या आव्हानानंतर शिंदे यांनी वरळी येथे जाहीर सभा घेतली. या सभेत शिंदे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले आहे. मी अशी छोटी नव्हे तर मोठी आव्हानं स्वीकारतो. सहा महिन्यांपूर्वी असेच एक आव्हान स्वीकारले होते, असे एकनाथ शिंदे म्हणाले. दरम्यान, भाजपा-शिंदे गटाकडून ही सभा यशस्वी झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई युवती संघटक अदिती नलावडे यांनी आपल्या ट्विटर खात्यावर सभेतील एक खास व्हिडीओ ट्वीट करून सभा अयशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
हेही वाचा >> उमेदवारी अर्ज मागे घेणार का? प्रश्न विचारताच अभिजित बिचुकले भडकले; म्हणाले, “मी राज ठाकरेंपेक्षा…”
आदिती नलावडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ भाजपा-शिंदे गटाने घेतलेल्या वरळी सभेतील असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सभेदरम्यान खुर्च्या रिकाम्या होत्या, असेही नलावडे यांनी सांगितले आहे. तसेच ‘वरळी आहे, वरळी. येथे न चाले खोके, न चाले कमळ’ असे खोचक ट्वीट त्यांनी केले आहे.
दरम्यान, या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना चोख शब्दांत प्रत्युत्तर दिलं. “काही लोक सकाळी उठले की गद्दार आणि खोके असे शब्द वापरतात. या शब्दांशिवाय त्यांच्याकडे काहीही नाही. मी त्याच्यावर भाष्य करत नाहीत. काही लोक आव्हान देत आहेत. पण मी माझ्या सहकाऱ्यांनी अगोदरच सांगितलेले आहे की, एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हानं स्वीकारतो. मी असेच मोठे आव्हान सहा महिन्यांपूर्वी स्वीकारलं,” असे प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले.