मुंबई : विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) जनाधार वाढवण्यावर भर दिला असून त्यासाठी जनता संवाद उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस प्रदेश कार्यालयात उपस्थित राहून पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेशी संवाद साधून त्यांचे प्रश्न सोडवणार आहेत.
हेही वाचा >>> केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
मंत्रालयासमोरील ‘राजगड’ या पक्षाच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचे मंत्री मंगळवार ते गुरुवार असे उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक मंत्र्यांना दिवस आणि वेळ नेमून दिली आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे मंगळवार ते गुरुवार असे आठवड्यातील तीन दिवस सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जनतेला भेटतील. प्रत्येक मंगळवारी अन्न आणि नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे तसेच युवक, क्रीडा कल्याण आणि अल्पसंख्याक विकासमंत्री दत्तात्रय भरणे त्याचबरोबर मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील हे प्रदेश कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.
बुधवारी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ आणि महिला व बालविकास आदिती तटकरे तर गुरुवारी राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे पक्ष कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
अस्वस्थता लपण्यासाठी आरोप
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) काही खासदार व आमदारांना तुम्ही फोन केला होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्या प्रकरणी राष्ट्रवादीचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. आम्ही कोणी त्या पक्षातील आमदार-खासदारांना फोन केलेला नाही. आमच्या संपर्कात त्यांचे कोणी नेते नाहीत. त्यांच्या पक्षात अस्वस्थता आहे. ती लपवण्यासाठी आमच्यावर असे आरोप केले जात आहेत.