आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर पक्षाची प्रतिमा सुधारण्याच्या उद्देशाने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे मागून घेतल्याने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पवार यांचा नक्की हेतू काय, इथपासून पक्षात बदलांचे वारे वाहत असताना काका-पुतण्यात एकवाक्यता आहे का, अशा शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक पवार यांनी बोलाविली होती. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले. वगळण्यात येणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे पुढील आठवडय़ात मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येतील. अजित पवार, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, सुनील तटकरे, गुलाबराव देवकर यांच्यावर झालेल्या विविध आरोपांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा खराब झाली.
सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेण्याच्या शरद पवार यांच्या धक्कातंत्रामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मंत्रीपद कायम राहते की नाही याची टांगती तलवार डोक्यावर राहणार आहे. त्यातच मंत्र्यांच्या घोटाळ्यांची पुन्हा चर्चा सुरू झाल्याने त्या मंत्र्यांमध्ये साहजिकच प्रतिक्रिया उमटली आहे. बदलांच्या वाऱ्यात अजित पवार कोणती भूमिका घेतात आणि त्यांची भूमिका शरद पवार मान्य करतात का, याकडे पक्षातील नेत्यांचे लक्ष लागले आहे.
प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड यांचा मंत्रिमंडळात समावेश करून बबनराव पाचपुते यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याची योजना होती. पण सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आल्याने आता प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड केली जाईल, याबाबत उत्सुकता आहे. नव्या अध्यक्षांच्या निवडीकरिता १५ तारखेला बैठक बोलाविण्यात आली आहे.
अध्यक्ष कोण व नारळ कोणाला?
या आठवडय़ात मंगळवार आणि बुधवारी पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाली. अजित पवार, आर. आर. पाटील त्या वेळी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. अध्यक्षपदी मराठा समाजातील नेत्याची निवड करण्यात येणार असल्यास आर. आर. पाटील, बबनराव पाचपुते यांची नावे चर्चेत येऊ शकतात. बिगर मराठा समाजाकडे अध्यक्षपद सोपवायचे झाल्यास छगन भुजबळ किंवा सुनील तटकरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो. रामराजे नाईक-निंबाळकर, बबनराव पाचपुते, गुलाबराव देवकर या मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे.
काँग्रेसवर दबाव वाढला
या खेळीमुळे राष्ट्रवादीने काँग्रेसवर दबाव वाढविला आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये बदल करण्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची योजना असली तरी त्यांना मुक्त वाव मिळालेला नाही.
दरम्यान, राष्ट्रवादीप्रमाणे पक्षाच्या संघटनेत कोणतेही बदल करण्यात येणार नाहीत, असे काँग्रेसच्या वतीने रात्री उशीरा स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader