मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचा एक बडा नेता माजी मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्याप्रमाणे लवकरच तुरुंगात जाईल, असे संकेत भाजप नेते मोहित कंबोज यांनी बुधवारी दिले. राज्यातील सिंचन गैरव्यवहार प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन महासंचालक परमबीर सिंह यांच्या काळात २०१९ मध्ये बंद करण्यात आले होते. याप्रकरणी पुन्हा चौकशी सुरु करावी, अशी मागणी कंबोज यांनी केली आहे. विरोधकांना धमकावण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईची भीती दाखविली जात असल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे.
कंबोज यांच्याच चौकशीची मागणी
मोहित कंबोज यांना कोण माहिती देत आहे, ते अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाऊन रोज बसत आहेत का आणि त्यांना ईडीसह अन्य तपास यंत्रणांच्या कारवाईची माहिती कशी मिळते, याची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.