राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) समन्स पाठवलं होतं. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अ‍ॅण्ड एफएस) गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांना सोमवारी ( २२ मे ) हजर राहण्यास सांगितलेलं. त्यानुसार जयंत पाटील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले होते. तब्बल ९ तासानंतर जयंत पाटील ईडी कार्यालयातून बाहेर आले. तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ईडी कार्यालयातून बाहेर आल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमे आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. “तुम्ही सर्व कार्यकर्ते सकाळपासून ईडी कार्यालयाबाहेर होता. तुम्ही थांबलात तुमचे आभार. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. त्यांचं पूर्ण समाधान मी केलं असून, त्यांच्याकडं काही प्रश्न राहिले असतील, असं मला वाटत नाही. मी माझे कर्तव्य पूर्ण पार पाडलं,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.

हेही वाचा : “राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ”, अजित पवारांच्या विधानावर आदित्य ठाकरेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले…

“पुन्हा जेव्हा बोलवण्यात येईल, तेव्हा…”

“आयएल अ‍ॅण्ड एफएसच्या कंत्राटांशी माझा कधीही संबंध आला नाही. पुन्हा जेव्हा बोलवण्यात येईल, तेव्हा चौकशीला येणार असल्याचं ईडीला सांगितलं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले.

“सर्वांना माहिती की जयंत पाटील स्वच्छ असून…”

विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रमुख नेत्यांनी ईडी चौकशीबद्दल कोणतेही भाष्य केलं नाही? असा प्रश्न विचारल्यावर जयंत पाटलांनी सांगितलं की, “प्रमुख नेत्यांना महत्वाची काम असून, ते पक्षकार्यात गुंतलेले असतात. पण, सर्वांना माहिती की जयंत पाटील स्वच्छ असून, चौकशीनंतर बाहेर येतील. याची खात्री आणि माझ्यावर विश्वास असल्याने कोणीही मुंबईत उपस्थित राहिले नाहीत.”

हेही वाचा : मविआचा लोकसभेसाठी १६-१६-१६ चा फॉर्म्युला ठरलाय? जागावाटपावर पहिल्यांदाच बोलले संजय राऊत; म्हणाले, “काही जागांची…”

“चांगले काम करणाऱ्यांना त्रास देण्यात येतोय”

जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे. “देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा नेत्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. अनिल देशमुख यांच्यावर अतिरंजित आरोप करण्यात आले. सध्या चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण दिले जात असून, चांगले काम करणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार होत आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jayant patil enforcement directorate inquiry ended after 9 hour over il and fs case ssa