विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेस, शिवसेना आणि आमची चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या कमी असेल, तर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी काँग्रेसकडे जाईल. अधिवेशन चालू झाल्यावर विरोधी पक्षनेते पदावर निर्णय होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. ते यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीकडे सध्या आमदारांची संख्या किती? या प्रश्नावर जयंत पाटील म्हणाले, “आमच्याकडे १९ ते २० आमदार आहेत. बरेच आमदार दोन्हीकडे असल्यासारखं दाखवत आहेत. सर्व आमदारांची मानसिकता शरद पवार यांच्याबरोबर राहण्याची होती आणि आहे.”
हेही वाचा : शरद पवार आणि बंडखोर आमदारांच्या भेटीत काय घडलं? जयंत पाटलांनी दिली माहिती; म्हणाले, “सर्वांनी…”
विरोधी पक्षनेते पदाबाबत काँग्रेसबरोबर चर्चा झाली का? असे विचारल्यावर यावर जयंत पाटील यांनी म्हटलं, “माझी अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांची काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा होणार आहे. विरोधी पक्षनेते पदाबाबत योग्य निर्णय होईल.”
हेही वाचा : अजित पवारांसह आमदारांच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया काय होती? प्रफुल्ल पटेल म्हणाले…
“आमदारांची संख्या पाहिली तर विरोधी पक्षनेते पदावर दावा करणं योग्य नाही. ज्या पक्षाकडे जास्त आमदार आहेत, त्यांच्या पाठिंब्याशिवाय विरोधी पक्षनेता काम कसं करणार? आमच्यातून बाहेर गेलेली लोक फुटले आहेत, असं सांगत नाहीत. विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा दिला आहे. विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे. कागदावर आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. पण, आमच्यातील ९ जणांनी मंत्रपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे विरोधी पक्षांशी चर्चा विचारविनिमय करावा लागेल,” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.