राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच महेश आहेर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महेश आहेर यांनी आपल्या मुलीच्या हत्येचा कट रचला असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला होता. याबाबतची एक ऑडिओ क्लिपही जितेंद्र आव्हाडांनी पोलिसांना दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या संपूर्ण घटनाक्रमानंतर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा आपल्याकडे तब्बल आठ तासांचे ऑडिओ क्लिप्स असल्याचा दावा केला आहे. या संबंधित आपण लवकरच पेनड्राइव्ह बॉम्ब फोडणार आहे, असंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. ते विधानभवनाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा- “मागील ४०-५० वर्षांपासून महाराष्ट्रात एक नारदमुनी…”, विधान परिषदेत गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल!

पत्रकारांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “महेश आहेर या अधिकाऱ्याला प्रचंड माज आहे. माझ्याकडे त्यांच्या आठ तासांच्या ऑडिओ क्लिप्स आहेत. त्यातील काही निवडक ऑडिओ क्लिप्स आम्ही बाहेर काढल्या आहेत. अजून बॉम्बस्फोट बाहेर यायचा आहे. त्याने जेव्हा माझ्या मुलीला ठार मारण्याची सुपारी दाऊद गँगला दिल्याचं बोललं. तेव्हा मला वाटलं, संवेदनशील सरकार त्या अधिकाऱ्याची बदली करेल. त्याला पोलीस बोलवतील. जबाब नोंदवला जाईल. पण त्यांनी उलटा मार्ग काढला, त्यांनी संबंधित ऑडिओ क्लिप्स फॉरेन्सिक लॅबला पाठवले. पण आणखी दोन तासांनी मी यातलं सत्य उघड करणार आहे.”

हेही वाचा- “आम्ही पवारांना नेहमी घाबरून असतो, त्यामुळे…”, गुलाबराव पाटलांची टोलेबाजी!

“आता जी नवीन ऑडिओ क्लीप समोर आली आहेत. त्यामध्ये तो काही पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोलत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी टाईट होऊन मुख्यमंत्र्यांना फोन लावला, असं तो बोलत आहे. ही केवढी मुजोरी आहे. मी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम करतो, असंही तो ऑडिओ क्लिपमध्ये म्हणत आहे. पण माझी खात्री आहे, यातील मुख्यमंत्र्यांना काहीही माहीत नसेल, असं मी समजतो. कारण मुख्यमंत्र्यांना मी जवळून ओळखतो. पण आजुबाजूला जे चमचे आहेत, या चमच्यांमुळे मुख्यमंत्री त्रस्त आहेत. एवढा मग्रुर अधिकारी माझ्या पोरीच्या खुनाबद्दल बोलतो. त्याची बदली तर सोडाच, त्याचं कौतुकच केलं जातंय,” असे गंभीर आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leader jitendra awhad serious allegations on mahesh aher about plot murder for his daughter rmm