भास्कर जाधव यांनी मुलांच्या विवाहात केलेल्या उधळपट्टीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तिखट शब्दांत नाराजी व्यक्त केली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपल्या संपत्तीचे जाहीर प्रदर्शन करणे सुरूच आहे. त्यामुळे ते पवार यांना जुमानत नाहीत का, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे.
पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही नवी मुंबईचे उपमहापौर अशोक गावडे यांनी लगेच १४ फेब्रुवारीला मुलीच्या विवाहात लक्षभोजन घातले. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी १५ फेब्रुवारीला आपल्या वाढदिवसानिमित्त ७५ हजार लोकांना इच्छाभोजन दिले आणि मद्यपार्टीवर ६० लाख रुपये खर्च केले. अर्थमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १० हजारहून अधिक फलक १६ फेब्रुवारी रोजी सर्वत्र लावले गेले. सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांच्याकडे झालेल्या विवाहात हजारो लोकांना १८ फेब्रुवारीला भोजन घातले गेले आणि त्यावर करोडो रुपये खर्च झाले, असे भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.
चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती दत्तात्रय घुगे हा साडेतीन किलो वजनाचा सोन्याचा शर्ट व ७ किलो सोन्याचे दागिने घालून फिरतो. पवार यांच्या माढा लोकसभा मतदार संघातील सांगोला तालुक्यातील आ.दीपक साळुंके यांनीही आपल्या वाढदिवसानिमित्त १० हजार होर्डिग्ज तालुक्यात लावली. पवार यांनी सांगूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते संपत्तीचे प्रदर्शन व उधळपट्टी करीत आहेत, असा आरोप भांडारी यांनी केला आहे.

Story img Loader