शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वेस्थानकादरम्यान ट्रेनखाली उडी घेऊन त्यांनी आयुष्य संपवलं. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यांच्या निधनानंतर हळहळ व्यक्त होते आहे. शिवसेनेचे माजी नेते सुधीर मोरे यांच्या निधनाची बातमी धक्कादायक आहे. विक्रोळी पार्क साईट परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता अशा प्रतिक्रिया शिवसेनेकडून येत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन देशमुख यांनी एक पोस्ट लिहून सुधीर मोरेंनी नको ते धाडस करायला नको होतं असं म्हटलं आहे.
काय आहे नितीन देशमुख यांनी फेसबुक पोस्ट?
कालची घटना ऐकली आणि स्तब्ध झालो. एक दिवस आधीच त्यांची भेट झाली होती, माझ्या काही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांची आणि त्यांची ओळख करून दिली.आदरणीय शरद पवार साहेबांचे काय चाललंय, अशी विचारपूस त्यांनी केली. आहेस त्या गटात रहा, असा सल्लाही त्यांनी दिला. पण अचानक बातमी आली की, सुधीर मोरे साहेब हयात नाहीत आणि मला धक्काच बसला. माझ्या आयुष्यात एवढा धाडसी माणूस मी कधीच पाहिला नव्हता.
निधड्या छातीचा, धाडसी, निर्भय आणि पैशांचा मोह नसलेला हा माणूस. पैसा हा त्याच्यासमोर गौण होता. रोजच्या खर्चाचा भाग सोडला तर त्यांच्या फारशा काही गरजा नव्हत्या. विक्रोळी पार्कसाईट, लाल बत्ती डोंगरावरील काही लोकांची नावे विसरता येणार नाहीत, अशा काही मातब्बर मंडळीमंडळे सुधीर मोरे साहेब यांचा समावेश होतो.
शिवसेनेतून फुटून जेव्हा नारायण राणे साहेब बाहेर पडले. तेव्हा कोकणात राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना गाठून त्यांच्यावर उघडपणे टीका करणारे सुधीर मोरे होते.खासदार विनायक राऊत राणेंच्या विरोधात भाषण करत असताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे सुधीर मोरे, हे साक्षात त्यांचे कवच होते. म्हणूनच राऊत एवढ्या उघडपणे टीका करू शकले.
हे पण वाचा- शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे यांची आत्महत्या, ट्रेनखाली उडी घेऊन आयुष्य संपवलं
सुधीर मोरेंनी काल नको ते धाडस का केलं? हाच प्रश्न कालपासून माझ्या मनात सलत आहेत. पार्कसाईटमधील प्रत्येक गल्लीत किती मतदार आहेत, किती बुथ आहेत. पुरुष-महिला किती, किती नवे मतदार आहे, किती सोडून गेलेत… याची सर्व खडा न खडा माहिती मोरेंच्या डोक्यात फिट असायची, याचेही अनेकांना आश्चर्य वाटायचे. मागच्या वर्षी मोरे साहेबांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देताना मी म्हटले होते की, हा माणूस लोकनेता व्हायला हवा होता. लोकांचा प्रवाह त्यांच्या पाठिशी होता. सुधीर मोरे यांनी मनात आणले असते तर खूप मोठे झाले असते, पण त्यांनी महत्त्वकांक्षावर अंकुश ठेवला. स्वतःचा वॉर्ड आरक्षित झाला तरी इतर कुठेही उड्या न मारता आपल्याच वॉर्डमध्ये निस्वार्थीपणे काम करणारे मोरे साहेब एकमेव व्यक्ती होते.
लोकांशी थेट संपर्क, लोकांच्या प्रश्नांसाठी कुणासाठीही पंगा घेण्याची तयारी आणि त्यासाठी लागणारे धाडस मोरे यांच्यात ओतप्रोत भरलेले होते. जरी आमचा पक्ष वेगळा असला तरी त्यांच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. अजातशत्रू स्वभावाचा माणूस असा अचानक सोडून जाणे, हे पार्कसाईट विभागाचे खूप मोठे नुकसान आहे. विक्रोळी पार्कसाईट या छोट्याश्या टापूचे मोरे एक राजेच होते. राजकीय संस्कृती आज कलुषित होत असताना निर्मळ मनाचा राजकारणी आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व विक्रोळी पार्कसाईटने गमावले.
सुधीर मोरे, आजपासून आकाशाकडे नजर जाईल, तेव्हा असंख्य ताऱ्यांच्या समूहात तुम्ही त्या ताऱ्यांचे नेतृत्व करणारे तारे म्हणून आम्हाला दिसाल. हीच भावना आज पार्कसाईटमधील माझ्यासारख्या हजारो लोकांची आहे. मोरे साहेब तुम्ही आमच्यासाठी स्टार होतात आणि राहाल. माझ्या वैयक्तिक सुख-दुःखात तुम्ही जी साथ दिलीत, ती कायम स्मरणात राहिल. तुमच्यासारखेच निस्वार्थी वृत्तीने लोकांसाठी झटत राहण्याचे काम माझ्याकडून होईल, असा शब्द देऊन भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो.
‘’ओम शांती’’
अशा शब्दांमध्ये नितीन देशमुख यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. तसंच त्यांच्या बरोबरचा फोटोही पोस्ट केला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन देशमुख यांनी लिहिलेली ही पोस्ट चर्चेत आहे.