भास्कर जाधव यांच्या सडेतोडपणामुळेच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यास पक्षातील काही नेत्यांचा आक्षेप होता. काही तरी वादग्रस्त बोलून ते पक्षाला अडचणीत आणतील, असा भीतीचा सूर पक्षात आहे. यामुळेच बोलताना सांभाळा, असा सल्ला छगन भुजबळ यांना भाषणात द्यावा लागला.
भास्कर जाधव यांची निवड करण्याचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला होता. मात्र त्यास आक्षेप घेत जाधवांना बोलताना भान राहात नाही आणि ते वाहावत जातात, अशीच सर्वाची भावना होती. राजकीय लाभाकरिता शरद पवार यांनी ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर चारच दिवसांत जाधव यांनी अनधिकृत बांधकामे पाडली पाहिजेत, अशी भूमिका विधिमंडळात मांडली होती याकडे राष्ट्रवादीचे नेते लक्ष वेधतात. जाधव किंवा जितेंद्र आव्हाड हे दोघेही आक्रमक असल्यानेच त्यांना भुजबळ यांनी वडिलकीचा सल्ला दिला. एक वेळ भाषण पडले तरी चालेल, पण एखाद्या विधानावरून वादग्रस्त ठरू नका, असा सल्ला दिला. अर्थात, भुजबळ यांचा हा सल्ला अजित पवारांनाही लागू होता. कारण दुष्काळावरून त्यांनी केलेले विधान पक्षाला महागात पडले होते.
तटकरे यांना सूचक इशारा
जलसंपदामंत्री सुनील तटकरे आणि भास्कर जाधव यांचे संबंध सर्वश्रूतच आहेत. मागे साहित्य संमेलनाच्या आयोजनावरून जाधव यांनी तटकरे यांच्यावर जाहीरपणे तोफ डागली होती. याच तटकरे यांच्यावर पक्षाने जाधव यांच्या निवडीच्या ठरावाला अनुमोदन देण्याची वेळ आणली. आता जाधव यांच्याशी जमवून घ्या, असाच अप्रत्यक्ष सल्ला शरद पवार यांनी तटकरे यांना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे.