निवडणुका जवळ आल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये स्वबळाचे नारे आवळले जाऊ लागले तरी गेल्या वेळी लढलेल्या २२ जागांचाच आढावा घेऊन आगामी निवडणुकीत काँग्रेसबरोबर कायम राहणार असल्याचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला. तसेच राज्यातील नेत्यांवर अवलंबून न राहता निवडणुकीची सारी सूत्रे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुरुवातीपासूनच स्वत:कडे घेतली आहेत.
लोकसभा निवडणुकांच्या तयारीकरिता पक्षाचे मंत्री, खासदार-आमदार व पदाधिकाऱ्यांशी पवार यांनी गेले दोन दिवस संवाद साधला. काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली असली तरी राष्ट्रवादीने मात्र गेल्या निवडणुकीत आघाडीत पक्षाच्या वाटय़ाला आलेल्या २२ मतदारसंघांचाच आढावा घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांच्या पाश्र्वभूमीवर निम्म्या जागा मिळाल्या पाहिजेत, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मागणी करण्यात येत असली तरी पवार यांनी गेल्या वेळी वाटय़ाला आलेल्या जागांचाच आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीपर्यंत तरी काँग्रेसबरोबर आघाडी कायम राहणार असल्याचे स्पष्ट संकेत पवार यांनी दिले आहेत. मात्र लोकसभेच्या निकालांवरच विधानसभा निवडणुकीचे ठोकताळे आखले जातील.
गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी सारी सूत्रे राज्यातील नेत्यांच्या हाती सोपविण्यात आली होती. तेव्हा पक्षाची चांगलीच पिछेहाट झाली होती. मात्र नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी पवार यांनी सारी सूत्रे हाती घेतली असता लोकसभेच्या तुलनेत राष्ट्रवादीची परिस्थिती सुधारली होती. या पाश्र्वभूमीवर लोकसभा निवडणुकीची सारी सूत्रे ही पवार यांनी आपल्या हाती घेतली आहेत. पक्षात आपलाच शब्द अंतिम असतो हे पवार यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या वेळी स्पष्ट केले होते. दिल्लीत सत्तास्थापनेत महत्त्व वाढावे या दृष्टीने जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्यावर पवार यांनी भर दिला आहे. म्हणूनच पक्षाच्या वतीने ताकदवान उमेदवार रिंगणात उतरविण्यात येतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
राष्ट्रवादीने लढलेले
२२ मतदारसंघ
ठाणे, कल्याण, ईशान्य मुंबई, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड, जळगाव, रावेर, नाशिक, दिंडोरी, नगर, कोल्हापूर, हातकणंगले, अमरावती, बुलढाणा, भंडारा-गोंदिया, सातारा, माढा, मावळ, शिरुर, बारामती.
उदयनराजे गैरहजर, माढासाठी पवार यांनाच आग्रह
शरद पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकींना पक्षाची सर्व नेतेमंडळी उपस्थित होती, पण सातारा मतदारसंघाच्या आढाव्याच्या वेळी खासदार उदयनराजे भोसले हे उपस्थित नव्हते वा त्यांचे कोणी निकटवर्तीय फिरकले नाहीत. खासदार भोसले हे पक्षाच्या व्यासपीठावर येण्याचे टाळतात, तरीही राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या मागे फरफटत जातात. लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, असे शरद पवार यांनी जाहीर केले असले तरी माढा मतदारसंघातून तुम्हीच निवडणूक लढवा, अशी मागणी सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ांतील नेतेमंडळींनी पवार यांना केली. कल्याणमध्ये तांत्रिकदृष्टय़ा शिवसेनेत असलेले खासदार आनंद परांजपे यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मुंबईत आणखी एक जागा पक्षाला मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. राज्यसभा खासदार ईश्वर जैन यांची काँग्रेसबरोबर सलगी वाढल्याने ते सुद्धा बैठकीच्या ठिकाणी फिरकले नाहीत. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात राहिल, अशी ग्वाही पवार यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना दिली.
लोकसभेसाठी शरद पवारांकडेच राष्ट्रवादीचे नेतृत्व
निवडणुका जवळ आल्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये स्वबळाचे नारे आवळले जाऊ लागले तरी गेल्या वेळी लढलेल्या २२ जागांचाच आढावा घेऊन आगामी निवडणुकीत काँग्रेसबरोबर कायम राहणार असल्याचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दिला.
First published on: 28-04-2013 at 03:13 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp leadership will be with sharad pawar for general election