‘क्रिकेटमध्ये विजयाचे श्रेय कर्णधाराचे असते, तसेच पराभवाची जबाबदारीही त्यालाच घ्यावी लागते’, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसवर खापर फोडण्याचा प्रयत्न केल्याने राष्ट्रवादीच्या शिडातील हवा आधीच जाऊ लागली की काय, अशी शंकाउपस्थित झाली.
भारत विरुद्ध न्यूझिलंड मालिकेत भारताच्या पराभवानंतर खेळाडूंवर टीका केली जाते. पण कर्णधाराचीही तेवढीच जबाबदारी असते, असे सूचक उद्गार जाधव यांनी पत्रकार परिषदेत काढले. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कर्णधाराला का दोष देता यावरही त्यांनी उत्तर टाळले. मुंडे केवळ शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरच टीका करतात. उद्धव ठाकरेही पवारांनाच आव्हान देतात. विरोधकांनी फक्त राष्ट्रवादीच्या नेत्यांना लक्ष्य केल्याने काँग्रेसचे नेते कदाचित सुखावले असावेत. तथापि, अपयश आल्यास कर्णधार जबाबदार असतो, असा टोमणा त्यांनी काँग्रेसला उद्देशून मारला.
जागावाटपाचा निर्णय काँग्रेसने लवकर घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चार दिवसांत निर्णय घ्यावा, असा इशारा किंवा मुदत काँग्रेसला देण्यात आलेली नाही. शक्यतो लवकरात लवकर निर्णय व्हावा एवढीच राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. काँग्रेसचा काही वेगळा विचार असल्यास त्यांनी तो जरूर करावा, पण काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवण्यावर राष्ट्रवादी ठाम असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत निवडक नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पार पडली. या वेळी पक्षाच्या वतीने लढविण्यात येणाऱ्या २२ मतदारसंघांचा आढावा किंवा राजकीय परिस्थिती जाणून घेण्याकरिता पक्षाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांवर मतदारसंघांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बारामती आणि परभणी या दोन मतदारसंघांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नाशिकची जबाबदारी छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या काका-पुतण्याकडेच ठेवण्यात आली. ठाणे (गणेश नाईक), कल्याण (वसंत डावखरे), मावळ (सुनील तटकरे), शिरुर (दिलीप वळसे-पाटील), हातकणंगले (जयंत पाटील), नगर (मधुकरराव पिचड आणि बबनराव पाचपुते ) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.